आमदार सत्यजीत तांबे यांचे ‘नेतृत्व’ उजळणारी निवडणूक! ‘मामां’च्या पदार्पणाची पुनरावृत्ती; सिंहासाठी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची निवड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. महायुती, आघाडी अशा सुरुवातीला झालेल्या बाता प्रत्यक्ष मैदानावर मात्र फोल ठरल्या असून राज्यात बहुतेक ठिकाणी स्वबळ तर, काही ठिकाणी एकत्रित निवडणुका अशी स्थिती आहे. अशा विविध अंदाजाचे पूल बांधून झाल्यानंतर संगमनेरातून मात्र या उलट चित्र उभे राहीले असून तब्बल दोन तप काँग्रेस विचारांचा जागर करीत संघटनेसाठी दिवसरात्र एक करणार्या ‘तांबे परिवारा’ने वेगळी वाट निवडली आहे. तब्बल चार दशकानंतर यावेळी पहिल्यांदाच ‘थोरात-तांबे’ यांच्या राजकारणाने कलाटणी घेतली असून पालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण धूरा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 25 वर्षांच्या सक्रिय राजकारणात सतत उपेक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच काहीतरी करुन दाखवण्याची संधी मिळाल्याने त्यांनीही स्वतःला झोकून देत पुढील पाच वर्षांच्या कामाचे नियोजन करुन पन्नास वर्षांचे कालबद्ध ‘व्हिजन’ मतदारांसमोर मांडले आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार तांबे यांचे मामा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे राजकीय पदार्पण अशाच प्रकारे ‘अपक्ष’ म्हणून झाले होते, त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह सिंह होते, तब्बल चार दशकानंतर त्याची पुनरावृत्ती झाली असून उच्चशिक्षित असलेल्या डॉ.मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या त्यांच्या पॅनलनेही ‘सिंह’ निशाणी घेतली आहे. त्यासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आमदार तांबे मतदारांना आपली भूमिका पटवून देण्यात यशस्वी झाले असून ही निवडणूक त्यांचे नेतृत्व उजळणारी ठरेल हे मात्र निश्चित.

‘वारसाने संधी मिळते, कर्तृत्व सिद्ध करावेच लागते’ या सूत्रावर विश्वास असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनाही मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अंगाखांद्यावर खेळून त्यांनी राजकीय बाळकडू मिळवले. घरात काँग्रेस विचारांचा जागर असल्याने त्यांच्यावरही त्याच विचारांचे संस्कार झाले. त्यातून विद्यार्थीदशेतच ते काँग्रेसच्या संघटनात्मक साखळीला जोडले गेले. युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. या कालावधीत त्यांनी शहरातील तरुणांचे संघटन बांधून त्यात नव्याने प्राण फूंकले. पुढे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून ते विजयी झाले आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेवर दुसर्यांदा निवड झाल्यानंतर पक्षाने अडीच-अडीच वर्ष अध्यक्षपदावर त्यांची बोळवण करीत शेवटपर्यंत त्यापासून त्यांना वंचित ठेवून त्यांच्या कर्तृत्वाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी त्यांनी ‘त्या’ घटनेला फारसे महत्त्व न देता संघटनात्मक पातळीवर काम सुरुच ठेवले. त्यातून त्यांची सुरुवातीला महाराष्ट्रप्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी व नंतर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. हा काळ देशभरात काँग्रेसची राजकीय पीछेहाट होणारा होता. मात्र त्या उपरांतही प्रदेशाध्यक्ष असलेल्या सत्यजीत तांबे यांनी अडचणीत असलेल्या पक्षाला खिंडीत सावरुन मोठ्या प्रमाणात सुरु झालेली भगदड थोपवली. पदावरुन पायउतार झाल्यानंतरही त्यांनी मामा बाळासाहेब थोरात व वडिल डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनासाठी पक्षाचे काम सुरुच ठेवले. या दरम्यान त्यांची राहुल गांधी यांच्याशीही जवळीक वाढली होती. त्यामुळे त्यातून आपल्याला राजकीय नाहीतर किमान संघटनात्मक पातळीवर काम करण्याची संधी मिळेल अशी आशा ठेवून त्यांनी प्रदेश पातळीपासून राष्ट्रीयस्तरापर्यंत पत्र लिहून शाई नासवली, मात्र कोठूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाला वडिलांऐवजी आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी केली, मात्र त्यांच्या पक्षातील एक मोठा वर्ग सत्यजीत तांबे यांच्या कर्तृत्वाला सातत्याने विरोध करणारा असल्याने येथेही त्यांनी बाजी मारली. या दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील ‘कर्तृत्व’ हेरुन त्यांना पाठींबा जाहीर केला आणि सत्यजीत तांबे राज्याच्या वरीष्ठ सभागृहात दाखल झाले. गेल्या दोन वर्षात त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून असंख्य प्रश्नांना वाचा फोडून त्यातून मार्ग काढले. प्रत्येक प्रश्नामागील त्यांचा अभ्यास, विषयाचा आवाका मांडण्याची शैली आणि त्यांची दृष्टी यातून उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांनी नेहमी त्यांना जवळ ठेवले. पक्षादेश झुगारुन उमेदवारी केल्याने पक्षाने तात्काळ डॉ.सुधीर तांबे यांच्यासह नूतन आमदार सत्यजीत तांबे यांना त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान एका क्षणात विसरुन दोघांनाही निलंबित करण्यात आले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतरही आमदार सत्यजीत तांबे यांच्या मुख्यमंत्र्यांशी असलेल्या संबंधावर कोणताही परिणाम दिसून आला नाही. त्यातच यावेळच्या पालिका निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचेही समोर आल्याने संगमनेरात महाविकास आघाडीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेचे नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आल्याने व सध्या त्यांच्यासह माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यावरील निलंबन आजही कायम असल्याने काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडणूका लढवल्या जाण्याची शक्यता खूप कमी होती. आमदार सत्यजीत तांबे यांनी यापूर्वी अनेकदा ‘आपण विरोधक नाही’ असे सूचक वक्तव्यही केले आहे. त्यामुळे पक्ष चिन्हा बाबतची साशंकता पूर्वीपासूनच कायम होती.

उच्चशिक्षित, सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निवड करतानाही त्यांनी प्रभागनिहाय प्रभावी चेहर्यांचा शोध घेण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचे दिसून आले. तीस उमेदवारांमध्ये यावेळी तब्बल 19 नवीन चेहरे देताना त्यांनी शिक्षण, व्हिजन आणि तळमळ या गोष्टींना अधिक महत्व दिल्याने निम्म्याहून अधिक कोर्या पाट्या देण्यात ते यशस्वी ठरले. सर्व विचारांच्या लोकांना प्राधान्य देण्याच्या हेतूने त्यांनी पक्ष, विचार यांच्या मर्यादाही ओलांडल्या आणि संगमनेर सेवा समिती या बॅनरखाली त्या सर्वांना उभे करुन आपल्यातील संघटन कौशल्याचे जीवंत उदाहरणही उभे केले.

मामाच्या राजकीय विचारांचा प्रभाव असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी इतिहासाची पानं उलटवताना पुन्हा 1985 सालच्या आठवणीही ताज्या केल्या असून त्यावेळी कर्तृत्व असतानाही केवळ अंतर्गत राजकारणासाठी उमेदवारी नाकारण्यात आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवारी करताना ‘सिंह’ या चिन्हासह निवडणूक जिंकली होती. आमदार तांबे यांनी त्या प्रसंगालाही या निवडणुकीतून उजाळा दिला असून आजच्या स्थितीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेली ही निशाणी मिळवण्यासाठी त्या पक्षाच्या नावाचा वापर केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी ‘ध्येय’ समोर ठेवून संगमनेर शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना आपले पुढील पाच वर्षांचे धोरण आणि त्यातून 50 वर्षांचे व्हिजन सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून त्यांच्या या परिश्रमाला मतदारांचेही पाठबळ वाढत आहे. संगमनेरच्या विकासात नागरिकांच्या सूचनांचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत साडेआठ हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रभागनिहाय तेथील उमेदवारांना सोबत घेवून ते मतदारांना आपला विचार पटवून देत असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मुसंडीही मारल्याचे दिसत आहे. कोणत्या बॅनरखाली निवडणूक घ्यावी इथपासून निवडणूक चिन्हापर्यंत आणि लोकसहभागातून तयार केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी 100 दिवसांपासून ते पाच वर्षांपर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम पाहता ही निवडणूक त्यांच्या कर्तृत्वाला उजळणारी ठरणार हे निश्चित आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मूशीतून घडलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या गेल्या 25 वर्षांच्या राजकिय कारकीर्दीवर दृष्टीक्षेप टाकल्यास दरवेळी पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून त्यांना डावलल्याचे दिसून येते. 1999 साली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्ष अडचणीत असताना अगदी आक्रमकपणे प्रदेशाध्यक्षपदी काम करुन पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास टीकवून ठेवला. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत वडिलांच्या जागी त्यांना उमेदवारी देण्याची मागणीही फेटाळण्यात आली. त्यावरुन पक्षात कोणतीतरी शक्ति त्यांच्या कर्तृत्वाला बाधा निर्माण करीत असल्याचेही दिसून आले. मात्र त्या उपरांतही त्यांनी अपक्ष उमेदवारी करताना आपले कर्तृत्व सिद्ध करुन दाखवले. आता संगमनेरच्या राजकारणात त्यांना पहिल्यांदाच आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची संधी मिळाल्याने ते त्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

