खिंडीत अडकलेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी पुन्हा थोरात? गेल्यावेळी सत्ता मिळवून देण्यात वाटा; पक्षाला पडझड थांबवणार्या नेतृत्वाची गरज..

श्याम तिवारी, संगमनेर
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणारी महाविकास आघाडी फूटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. सत्ताधारी गटातील काही मंत्र्यांकडून पुन्हा पक्षफूटीचे ‘बार’ फुटू लागल्याने राज्याला आणखी एका राजकीय भूकंपाच्या अनुभवाचीही शक्यता आहे. अशावेळी आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसला कथीत फूट टाळण्यासह आघाडीला एकसंध ठेवून राज्याला दमदार विरोधक देणार्या नेतृत्वाची गरज आहे. मात्र पक्षात सध्या अनुभवी प्रदेशाध्यक्ष हवायं की, उसळत्या रक्ताचा यावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्षांची सद्यस्थिती आणि आगामी पाच वर्षातील राजकीय आव्हानांचा विचार करता काँग्रेससारख्या राष्ट्रव्यापी पक्षाला अनुभवी नेतृत्वाचीच अधिक गरज आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये राज्यातील काँग्रेसचा जनाधारही घसरणीला आहे. अशा अडचणीच्या काळात नेतृत्व स्वीकारुन केवळ पक्षाला सावरण्याचीच नव्हेतर थेट सत्तेत नेवून बसवण्याची किमया साधणार्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिली जावीत असा काँग्रेसमधील मोठ्या वर्गाचा सूर आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 44.2 टक्के मतांसह 30 जागा पटकावणार्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मात्र सपाटून मार खावा लागला. राज्यातील जनता महायुतीच्या विरोधात आहे या एकमेव फाजील आत्मविश्वासाच्या बळावर गाफील राहीलेल्या आघाडीवर महायुतीच्या ‘लाडकी बहिण योजना’ आणि ‘एक है, तो सेफ है’ या गोष्टी भारी ठरल्या आणि महाविकास आघाडीचा स्वप्नभंग झाला. या निवडणुकीत 17 टक्के मतांसह लोकसभेच्या सर्वाधीक 13 जागा पटकावणार्या काँग्रेसला अवघ्या 12.5 टक्के मतांसह 16 जागा मिळाल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 16.1 टक्के मतांसह 44 जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपने 2014 मध्ये 28.1 टक्के मतांसह 122, 2019 मध्ये 26.1 टक्के मतांसह 105 आणि 2024 मध्ये 27 टक्के मतांसह 132 जागा पटकावल्या.

गेल्या दहा वर्षातील भाजपच्या कामगिरीचा आलेख 28.1 टक्क्यापासून किरकोळ खालीवर होवून तेथेच स्थिरावला. निवडून आलेल्या जागांमध्ये मात्र
अमुलाग्र बदल बघायला मिळाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार्या मतांमध्ये फार बदल झाला नव्हता. त्याचवेळी 2014 साली 18.1 टक्के मतांसह 42, त्यानंतर 2019 मध्ये दोन टक्क्यांच्या घटीसह 16.1 टक्के मतांसह 44 अणि 2024 मध्ये अवघ्या 12.5 मतांसह 16 जागा पटकावणार्या काँग्रेसने गेल्या दहा वर्षात आपले साडेसहा टक्के मतदार गमावले आहेत. गेल्या मोठ्या कालावधीपासून राज्यातील बहुतेक सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. आगामी कालावधीत एकमागून एक त्यांच्याही निवडणुकांचे बार उडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेसचा घटणारा जनाधार सावरुन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी उभारी भरणार्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यासाठी अनुभवाचा कस लागणार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी व्यक्तिची निवड व्हावी असा काँग्रेसमधील मोठ्या वर्गाचा सूर आहे.

त्यांच्यासोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर अशा पहिल्या फळीतील नेत्यांसह माजीमंत्री अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील या नव्या दमाच्या नेत्यांचीही चर्चा आहे. खरेतर विधानसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीने एकत्रितपणे मंथन करण्याची गरज होती. मात्र दीर्घकाळ कोणीही एकमेकांशी संवाद साधला नाही. काल-परवा घाईघाईत आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आणि दुसर्याच दिवशी ठाकरेंनी स्वबळाकडे इशारा केला. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम राहील की नाही याबाबत साशंकता आहे. एकीकडे आघाडीच्या एकसंध असण्यावरच प्रश्न असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत.

उद्योगमंत्र्यांनी थेट दावोसच्या उद्योगपीठावरुन ‘उबाठा’ आणि ‘काँग्रेस’मधील संपर्कातील संख्या सांगत राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे. आज-उद्यात रत्नागिरीत त्याचा प्रत्यय देण्याची पुनर्घोषणाही त्यांनी मुंबईत परताच केली. राष्ट्रवादीतील अलिकडच्या घडामोडी, नेत्यांच्या शब्दांमध्ये झालेले बदल पाहता सगळं आलबेलं असल्याचे दिसत नाही. अशा स्थितीत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहत आहे. यावेळच्या निवडणुकीत राज्यातील दिग्गज नेत्यांसह माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला. मात्र त्यांचा चाळीस वर्षांचा दांडगा राजकीय अनुभव विचारात घेता सध्याच्या राजकीय अवस्थेत खिंडीत अडकलेल्या काँग्रेसला बाहेर काढण्याचे कसब फक्त त्यांच्यातच असल्याचे काँग्रेसमधील अनेकांचे मत आहे.

यापूर्वी जून 2019 मध्ये पक्ष अतिशय अडचणीत असताना त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पक्षातील पडझड थांबवून कार्यकर्त्यांना जिंकण्याची उभारी दिली. त्यांच्या कारकीर्दीत पक्षाला मिळणार्या मतांमध्येही किरकोळ घट झाली.
आघाडीच्या वाटाघाटीत त्यांची संयमी भूमिका काँग्रेसला शिवसेनेच्या जवळ घेवून गेली. त्यातून राज्यात अनपेक्षितपणे आघाडीचे सरकारही स्थापन झाले. या सगळ्या घटनाक्रमात बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारणार नाही. 2019 पेक्षाही यावेळी काँग्रेसची अवघड स्थिती आहे. मानहानीकारक पराभव आणि राजकीय भवितव्य या कारणांनी पक्षात फूटीचीही शक्यता आहे. अशावेळी बाळासाहेब थोरातांसारख्या अनुभवी नेत्याकडूनच पक्षाला संजीवनी मिळू शकते असे काँग्रेसमधील मोठ्या वर्गाचे मतं आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 17 जून 2019 रोजी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून त्यांना पुन्हा लढण्यास तयार केले. महायुती तुटल्यानंतर काँग्रेस शिवसेनेशी कधीही राजकीय संबंध निर्माण करणार नाही ही धारणा त्यांनी मोडली. त्यातून सामान्य माणसाच्या स्वप्नातही येणार नाही अशा प्रकारची काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आकाराला आली आणि भाजपच्या तोंडचा घास हिरावून विरोधकांनी राज्यात सत्ता स्थापन केली. यासर्व घडामोडीत बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी खिंडीत अडकलेल्या काँग्रेसला नव्या उमेदीने बाहेर काढून सत्तेत बसवणारे थोरातच या स्थितीतून पक्षाला सावरतील आणि आघाडीलाही एकसंध ठेवतील असा विश्वास काँग्रेसमधील मोठ्या वर्गाला वाटतो. यासर्व गोष्टींचा काँग्रेस ‘हायकमान’ कसा विचार करतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

