इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार? उत्सुकता पोहोचली शिगेला; आघाडी व महायुतीकडून विजयाचे दावे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता कार्यकर्त्यांमधून आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे दावे-प्रतिदावे सुरु झाले असून अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेली संगमनेर व शिर्डी मतदार संघातील निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांचे पारंपरिक बालेकिल्ले असलेल्या या दोन्ही मतदारसंघात गेल्या 15 दिवसांत आरोप-प्रत्यारोप व टीका- टिपणीने अक्षरशः राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे सुपूत्र डॉ.सुजय यांनी यावेळी शिर्डीबरोबरच संगमनेरमध्ये, तर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी संगमनेरसह शिर्डी मतदारसंघातही लक्ष घातल्याने यावेळी या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये दोघांच्या विजयासह इतिहासाची पुनरावृत्ती होणार की परिवर्तनातून नवा इतिहास घडणार यावरुन मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.


विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी ‘युवासंवाद यात्रा’ काढून संगमनेर तालुक्यातील 145 गावांमधील तरुणांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. तर, थोरात यांनी आपला मतदारसंघ मुलीच्या ताब्यात देत आपले संपूर्ण लक्ष शिर्डी मतदारसंघावर केंद्रीत करीत काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यासह प्रियंका गांधी यांनाही शिर्डीत आणून विखे-पाटलांवर मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपूत्र डॉ.सुजय यांनीही थोरातांना शह देण्यासाठी ‘युवासंकल्प यात्रा’ आयोजित करुन संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभांचा धडाका लावला होता.


त्यातून एकमेकांवर विकासापासून ते अगदी व्यक्तिगत पातळीवरही टीका-टिपणी झाल्याने संगमनेर व शिर्डी मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत. नगर दक्षिणेत झालेल्या पराभवाला माजीमंत्री थोरातच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचार यंत्रणेचे नेतृत्त्व करतांना संगमनेर मतदारसंघात अक्षरशः राळ उठवून दिली होती. या मतदारसंघात अजिबात विकास झाला नसून फक्त थोरातांच्या आसपास वावरणारे त्यांचे बगलबच्चे गलेलठ्ठ झाल्याचे घणाघाती टोलेही त्यांनी आपल्या वेगवेगळ्या सभांमधून लगावले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ गावोगावी सभा घेवून मतदारांना परिवर्तनाचे आवाहन केले.


तर, दुसरीकडे संगमनेर मतदारसंघ आपले घर असून तेथील मतदार आपल्या कुटुंबातीलच असल्याचे सांगत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरऐवजी शिर्डी मतदारसंघावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत करुन काँग्रेसच्या तिकिटावर लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले. शिर्डीतील दहशत मोडून काढण्यासाठी मतदारांनी यावेळच्या संधीचा सदुपयोग करावा असे आवाहनही त्यांनी शिर्डीतील मतदारांना केले. या निवडणुकीत आजी-माजी महसूलमंत्र्यांनीच एकमेकांचे थेट प्रतिस्पर्धी नसतानाही एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष घातल्याने या दोन्ही ठिकाणच्या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.


संगमनेर विधानसभा मतदारसंघावर 1985 पासून बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असून ते यावेळी सलग नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या चार दशकांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामे केल्याने त्यांचा विक्रमी मताधिक्क्याने विजय होवून इतिहासाची पुनरावृत्ती घडेल असा विश्‍वास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर, यावेळी संगमनेरकर त्यांची सुसंस्कृत दहशत मोडून काढतील व महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या पारड्यात मतांचे दान टाकतील अशी खात्री महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे.


1995 पासून शिर्डी मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील सातव्यांदा शिर्डीतून उभे असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांच्यासह त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक डॉ.राजेंद्र पिपाडा निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उतरले आहेत. या मतदारसंघातील कामांच्या जोरावर आपला विजय सहज मानणार्‍या विखे-पाटलांची दहशत संपवण्यासाठी मतदारांनी गणेश कारखान्याप्रमाणे साथ द्यावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीच्या मतदारांना केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात जावून केलेला प्रचार आणि आवाहनाला दोन्ही मतदारसंघातील मतदार किती महत्त्व देतात यावरुन संगमनेर-शिर्डीच्या निवडणुकीने राज्याची उत्कंठा ताणली आहे.


आजी-माजी महसूलमंत्र्यांनी प्रत्यक्षात एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याऐवजी एकमेकांच्या मतदारसंघातील विरोधी उमेदवारांना पाठबळ दिल्याने यावेळी संगमनेर व शिर्डी मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची अक्षरशः राळ उठवल्याने त्याचा मतदारांवर कितपत परिणाम झालाय याचा निकाल पाहण्यासाठी शनिवारपर्यंत (ता.23) प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र तत्पूर्वीच या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याने संगमनेर व शिर्डी मतदारसंघ राज्याच्या उत्कंठेचा विषय ठरले आहेत.

 

Visits: 4 Today: 4 Total: 112633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *