‘जे गाव करील, ते राव काय करील!’ धांदरफळ खुर्दने घातला आदर्श; सामान्य कुटुंबातील मयतांना मिळाला न्याय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरवड्यापूर्वी धांदरफळ खुर्दमध्ये वरातीत नाचणार्‍या वर्‍हाड्यांमध्ये ‘डीजे’चा टेम्पो घुसल्याने भीषण अपघात घडला होता. या घटनेत दोघांचा जागीच तर गंभीर जखमी झालेल्या अभिजीत ठोंबरे या तिसर्‍या तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना आणि त्यानंतर धांदरफळमध्ये उमटलेले त्याचे पडसाद यातून संपूर्ण पंचक्रोशीतील तणाव वाढला होता. मयत ठोंबरेचे पार्थिव सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गावात पोहोचल्यानंतर तर या तणावाचा विस्फोट होतो की काय अशीही स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांची मध्यस्थीही निकामी ठरल्यानंतर एका माजी राजकीय पदाधिकार्‍याने पुढाकार घेतल्याने समाधानकारक तोडग्याच्या अटीवर आज पहाटेच्या सुमारास हजारोंच्या साश्रूनयनांनी मयत अभिजीतला अखेरचा निरोप देण्यात आला. दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने धांदरफळच्या ग्रामस्थांनी एकजूट दाखवण्यासह ‘जे गाव करील, ते राव काय करील!’ या म्हणीचा अर्थही उलगडून दाखवला.

गेल्या ४ जानेवारी रोजी धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांचा मुलगा बिपीनची वर पाठवणीची मिरवणूक सुरु होती. या मिरवणुकीसाठी खास डीजेही मागवण्यात आला होता. त्यामुळे नवर्‍या मुलाच्या नातेवाईकांसह त्याची मित्रमंडळी बेधुंद होवून लग्नाचा आनंद घेत होती. अशातच डीजे वाहनाच्या चालकांची अदलाबदल झाली. यावेळी नव्याने वाहनचालक म्हणून रुजू झालेल्या चालकाने वाहनाच्या ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याने अचानक वाहनाचा वेग वाढून त्याने समोरील बाजूस नाचणार्‍या वर्‍हाडींना चिरडले.

या भयानक दुर्घटनेत बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८) यांचा वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला, तर भास्कर राघू खताळ (वय ७३) यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे, रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ असे सहाजण गंभीर जखमी झाले होते. त्यातील अभिजीत ठोंबरे (वय २२) या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने स्थानिक रुग्णालयाने त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्याला त्याच दिवशी रात्री उशिराने मुंबईला हलविण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर तेथेच उपचार सुरु असताना सोमवारी (ता.१५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याचे पार्थिव रुग्णवाहिकेतून धांदरफळ खुर्द गावात आणण्यात आले. तत्पूर्वीच आसपासच्या पंचक्रोशीसह धांदरफळातील हजारो नागरिक गावात येणार्‍या रस्त्यावरील चौकात त्याची प्रतीक्षा करीत बसून होते. रुग्णवाहिका गावात येताच गावकर्‍यांनी एकमुखाने मयत झालेल्यांची कौटुंबिक स्थिती बघता त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी मदत जाहीर करण्याची मागणी केली. मात्र यावेळी वरपिता गावातच नसल्याने थेट संभाषण होत नव्हते, त्यामुळे वेळेसह तणावातही भर पडत गेली. गावकर्‍यांची मागणी आणि वरपित्याचा प्रतिसाद यांचा ताळमेळ जुळत नसल्याने पेच सुटण्याची अपेक्षाही धुसरच होती.

तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी हस्तक्षेप करुन मध्यम तोडग्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यातही यश मिळाले नाही. यावेळी गावकर्‍यांनी त्यांना एकमुखाने राहिलेली तफावत सरकारी पगारातून करणार का? असा प्रतिसवाल केल्यानंतर त्यांनीही माघार घेतली. या दरम्यान घटनेनंतर जी गोष्ट डीजे मालकाने केली, ती वरपित्याला पूर्ण करण्यास अडचण काय? या एकाच मुद्द्यावर गावकरी शेवटपर्यंत ठाम राहिले. अनेकांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले, मात्र ते विफल ठरले. अखेर पंचायत समितीच्या एका माजी पदाधिकार्‍याने पुढाकार घेवून गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसारच मदत देण्याकामी मध्यस्थता केली.

मात्र सदरची गोष्ट वरपित्याने प्रत्यक्ष गावासमोर उपस्थित राहून सांगण्याची अट घातली गेल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात वरपित्याला गावकर्‍यांसमोर उपस्थित केले गेले. यावेळी त्यांनी घडली घटना दुर्दैवी असून त्यातून तिघांचा बळी जाणं वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त करुन मयत अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे (वय २२) याच्या दहाव्याच्या विधीपूर्वी त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर गावकर्‍यांनी संबंधित पदाधिकार्‍याच्या साक्षीने मयत तरुणाच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आणि सोमवारी पहाटे साडेपाच वाजता मयत झालेल्या अभिजीतवर आज (ता.१६) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धांदरफळसह पंचक्रोशीतील पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे फौजफाट्यासह उपस्थित होते. या घटनेतून ‘जे गाव करील, ते राव काय करील!’ या मर्‍हाटमोळ्या म्हणीचा अर्थही उलगडला.

Visits: 9 Today: 1 Total: 23104

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *