बी.जे.खताळ पाटलांच्या नावाचा संगमनेरात गैरवापर! पाटलांच्या नातुची पत्रकार परिषद; नावाच्या साधर्म्याला बळी पडू नका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक जिंकून संगमनेरचे लोकप्रतिनिधीत्व करणार्या दिवंगत नेते बी.जे.खताळ-पाटील यांचे नातु विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण हयात काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ असलेल्या खताळ-पाटील यांच्या नावाचा वापर करुन काहीजण गैरप्रकार करीत आहेत. याबाबत आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या असून त्यात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचाही सहभाग असल्याचे दिसून येते असा गंभीर आरोप करतानाच त्यांनी याबाबत आपण शहनिशा करीत असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे संगमनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राज्यातील विधानसभेची निवडणूक अवघ्या 48 तासांवर येवून ठेपली आहे, अशावेळी भाजपमध्ये असलेल्या विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी शनिवारी शिर्डीत प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रविवारी (ता.17) त्यांनी संगमनेरात पत्रकार परिषद घेत पक्षांतरामागील आपली भूमिका विशद् करतानाच महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यावर निशाणा साधताना अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोपही केले आहेत.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रमसिंह खताळ यांनी दिवंगत नेते बी.जे.खताळ-पाटील यांनी आयुष्यभर कॉग्रेसच्या विचारांचा जागर केल्याचे सांगितले. संगमनेर तालुक्याच्या जडणघडणीत खताळ-पाटलांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. मात्र मध्यंतरीच्या काळात आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय पूर्णतः आपण व्यक्तिगत पातळीवर घेतला होता असा खुलासाही त्यांनी सुरुवातीलाच केला.
कोणतंही राजकीय पदं मिळावं म्हणून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसून केवळ खताळ-पाटलांच्या नावाचा वापर करुन काहीजण गैरप्रकार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या प्रति त्यांची एकनिष्ठता आणि त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दाखलाही विक्रमसिंह खताळ यांनी यावेळी दिला. गेल्याकाही वर्षात संगमनेर तालुक्यातील गौण खनिज, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे अनेक प्रकार आपल्यासमोर आले असून त्या सर्वांची शहनिशा करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
या तक्रारींमधील काहींमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत असून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा त्यामागे हात असल्याचेही प्रथमदर्शनी दिसून येते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये असलेली एखादी व्यक्ति पक्षांतर केल्यानंतर अशाप्रकारचे आरोप करणं स्वाभाविक आहे असे कोणाला वाटतं असेल तर चुकीचे असून खताळ-पाटलांचा नातु म्हणून या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर आपण व्यथीत झालो आणि पाटलांच्या एकनिष्ठतेला, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नये यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. पाटलांचा नातु म्हणून त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी उमेदवाराच्या नावातील साधर्म्याला बळी न पडता काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहनही यावेळी केले.