सत्ताधार्‍यांना ‘सूचक’ इशारा देणारी निवडणूक! वाढलेला ’टक्का‘ कोणाच्या हिताचा; संगमनेर तालुक्यात उत्कंठा ताणली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण तालुक्यात उडालेला राजकीय धुरळा, आरोप-प्रत्यारोप, फाजील वक्तव्य, त्यातून घडलेल्या हिंसक घटना आणि त्यानंतर झालेली आंदोलनं यामुळे कधीनव्हे ती संगमनेरची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिनी मतदारांनीही उत्साह दाखवताना 75 टक्क्यांहून अधिक मतदान केले. त्यामुळे संगमनेरची निवडणूक अधिक उत्कंठावर्धक बनली आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या बाजूला कौल दिलाय याबाबत संपूर्ण मतदारसंघात पैंजा लागल्या आहेत. महिन्याभरात घडलेल्या विविध घडामोडी आणि त्यानंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन दोन्ही पक्षाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. राज्यसरकारची लाडकी बहिण योजना, ‘बटेंगे तो कटेंगे’यारख्या घोषणांच्या आधारे घडलेले धु्रवीकरणही यावेळी महत्वाचे ठरणार आहे. यासगळ्यांचा परिपाक शनिवारीच स्पष्ट होणार असला तरीही यावेळची निवडणूक सत्ताधार्‍यांना भविष्यातील राजकारणासाठी सूचक इशारा देणारी ठरेल हे मात्र निश्‍चित आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यंदा सलग नवव्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळचा विजय त्यांना राज्यातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वाधीक काळ आमदार राहिलेल्या दिवंगत गणपतराव देशमुख यांच्यानंतरचे स्थान मिळवून देणारा ठरेल. राज्यातील महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षाने बाळासाहेब थोरात यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना संगमनेर सोडून मुंबईतच थांबावे लागले.


त्यांच्या गैरहजेरीत मतदारसंघाची धुरा खांद्यावर घेत त्यांच्या राजकीय उत्तराधिकारी मानल्या जाणार्‍या डॉ.जयश्री यांनी ‘युवासंवाद यात्रा’ काढून तालुक्यातील 145 गावांमधील युवकांशी संवाद सुरु केला. त्याचवेळी माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी तळेगांवपासून ‘युवा संकल्प यात्रा’ काढून त्याला जोरदार प्रत्त्यूत्तर देण्यास सुरुवात केली. त्यातून संगमनेर तालुक्यातील वातावरण तापत गेले आणि आगामी निवडणुकीत संगमनेरात ‘विखे विरुद्ध थोरात‘ अशी लढत रंगेल असे आडाखेही बांधले गेले. आपल्या विजयाबद्दल आश्‍वस्थ असलेल्या माजीमंत्री थोरात यांनी आपल्यापेक्षा बाजूच्या शिर्डीत मतदारसंघात अधिक लक्ष घातले. त्यामागे त्यांच्या विखे-पाटलांशी असलेल्या राजकीय वैराची पार्श्‍वभूमी होती.


डॉ.जयश्री थोरात यांच्या संवाद यात्रेतील भाषणांना लक्ष्य करुन डॉ.सुजय विखे-पाटलांकडून त्याला काऊंटर केले जावू लागल्याने मतदारसंघातील वातावरण तापत असतानाच धांदरफळमधील त्यांच्या मंचावरुन वसंत देशमुख नामक पुढार्‍याने गरळ ओकली. त्याचे पडसाद तेथील कार्यक्रमावरुन माघारी परतणार्‍या विखे समर्थकांच्या वाहनांची तोडफोड आणि एका वाहनाला जाळून टाकण्यातून उमटले. या घटनेला जबाबदार धरुन पोलिसांनी थोरात यांच्या सख्ख्या चुलभावासह त्यांचे स्वीय्य सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि डझनभर महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह 25 जणांवर खुनाच्या प्रयत्नातंर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला.


या घटनेच्या रात्री डॉ.जयश्री थोरात यांच्यासह त्यांच्या समर्थक महिला व कार्यकर्त्यांनी संपूर्ण रात्र तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच घालवली. दुसर्‍या दिवशी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी डॉ.आंबेडकर स्मारकापासून शहर पोलीस ठाण्यापर्यंत महिलांचा मूकमोर्चा काढला. या मोर्चासाठी परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. धांदरफळमधील सभेतून ओकलेली गरळ, त्यानंतर झालेला हिंसाचार, पोलीस ठाण्यातील आंदोलनं आणि त्यावर गुन्ह्यांची श्रृंखला यामुळे हा विषय संगमनेरच्या निवडणुकीत केंद्रस्थानीही आला आणि त्याच कारणांनी डॉ.सुजय विखे-पाटलांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह लावणाराही ठरला.


त्यातूनच माजीमंत्री थोरात यांच्या विरोधात कोण? शिवसेनाच की भाजप? याबाबत शेवटच्या दिवसापर्यंत उत्कंठा ताणली गेली. अखेर आदल्या दिवशी रात्री दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या अमोल खताळ यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारीवरील सस्पेंस संपला. खताळ यांनी उमेदवारी मिळताच तालुक्यातील ग्रामीणभागाला लक्ष्य करीत मतदारसंघातील प्रत्येक गांव आणि वस्तीपर्यंत पोहोचून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मतदारसंघातील घराघरापर्यंत अमोल खताळ हे नावही पोहोचू लागले. त्यातच लाडकी बहिण योजनेमुळे ग्रामीणभागातील महिलांकडून अपेक्षा बाळगणार्‍या खताळ यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणाही आश्‍वासक वाटू लागल्याने त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला.


खताळांच्या दिमतीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील स्वतः उभे राहिल्याने त्यांनीही या निवडणुकीत झोकून प्रचार केला. त्यामुळे तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यातून थोरातांसाठी सुरुवातीला सहज वाटणारी निवडणूक अमोल खताळ यांनी अवघड अवस्थेकडे नेली. त्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यात सभा घ्यावा लागल्या. शिवाय तळेगावात अमित देशमुख यांच्यासह तीन खासदार आणि पठारभागात राष्ट्रवादीच्या स्टार नेत्या सुप्रिया सुळे यांची सभा घेवून मतदारांना साद घालावी लागली. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता.20) संगमनेर विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 48 हजार पुरुष व 1 लाख 40 हजार 889 महिला मतदारांमधील 1 लाख 14 हजार पुरुष (77 टक्के) आणि 1 लाख तीन हजार 250 महिला (73.28 टक्के) अशा एकूण 2 लाख 17 हजार 432 (75.19 टक्के) मतदारांनी आपला कौल मतदान यंत्रात बंद केला आहे. यावेळी मतदान करणार्‍यांमध्ये 22 हजार 699 नवीन मतदारांचीही भर पडली आहे.


विकास आणि निर्भयी वातावरण या मुद्द्यावर आपल्या सलग नवव्यांदा विजयासाठी आश्‍वस्थ असलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना नंतरच्या आठ दिवसांत मात्र शिर्डी मतदारसंघातील लक्ष हटवून आपल्या मतदारसंघात फिरावे लागले. स्टार प्रचारकांच्या सभा घ्याव्या लागल्या. मतदानातही मतदारांचा उत्साह दिसून आल्याने अमोल खताळ यांनी महाराष्ट्रातील सर्वाधीक ज्येष्ठ आमदार असलेल्या बाळासाहेब थोरात यांना कडवी लढत दिल्याचे स्पष्ट झाले. संगमनेरकर मतदार मतदान यंत्रातून नेमकं काय सांगतात हे पाहण्यासाठी शनिवारपर्यंतची प्रतिक्षा असली तरीही ही निवडणूक सत्ताधारी गटाला भविष्यातील राजकारणासाठी ‘सूचक’ इशारा देणारी ठरेल हे मात्र निश्‍चित.


आरोप-प्रत्यारोप आणि थेट हिंसाचाराच्या घटनांसह हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही घसरलेल्या संगमनेरच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनीही आधार दिल्याचे मतदानानंतर बोलले जात आहे. दशकांनंतर पहिल्यांदाच संगमनेरच्या लढतीत निर्माण झालेली ही चुरस मतदारांची उत्कंठा वाढवणारी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याच्या पारापारावर निवडणुकीच्या चर्चा रंगल्या असून अनेकांनी एकमेकांना पैंजा दिल्या आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात आपल्या विजयाबद्दल आश्‍वस्थ आहेत. तर, महायुतीच्या अमोल खताळ यांनी यंदा परिवर्तन घडणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. मतदारांनी या दोघांमधील कोणावर आपला विश्‍वास दाखवलाय यासाठी मात्र शनिवारची प्रतिक्षा आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 114772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *