टोलनाका मारहाण प्रकरणी चौघांना अटक! तालुका पोलिसांना सूचले शहाणपण; शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कारला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा वाहन चालकांमध्ये सुरु असलेल्या वादात उडी घेत हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याच्या कर्मचार्यांनी संगमनेरातील चौघांना बेदम मारहाण करण्याची घटना गेल्या शनिवारी (ता.26) घडली होती. या घटनेत भाजपचे शहर उपाध्यक्ष अतुल कासट यांच्यासह त्यांचे दोन भाऊ व मित्र असे चौघे जखमी झाले होते. या घटनेनंतर टोलनाक्यावरील कर्मचार्यांच्या दादागिरी विरोधात संगमनेरात जनक्षोभ उसळल्याने उशिराने शहाणपण सूचलेल्या तालुका पोलिसांनी कासट यांच्या कारला धडक देवून पसार झालेल्या नाशिक जिल्ह्यातील चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्या सर्वांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र सूत्रधार अमोल सरोदे याच्यासह तालुक्यातील सर्व आरोपी अद्यापही पोलिसांपासून दूरच आहेत.
गेल्या शनिवारी (ता.26) माजी नगराध्यक्ष व भाजपचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांचे ज्येष्ठ सुपूत्र अतुल आपले भाऊ अमरिश व अमित कासट यांच्यासह एका मित्राला घेवून आनंदवाडी (ता.संगमनेर) येथील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. रात्री बाराच्या सुमारास घराकडे येताना हिवरगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या कारला नाशिकचा नोंदणी क्रमांक असलेल्या एका कारची धडक बसली. त्यावरुन दोन्ही कारमध्ये बसलेल्या तरुणांमध्ये झालेल्या नुकसानासंदर्भात बोलणे सुरु असतानाच टोलनाक्यावर दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अमोल सरोदे याच्यासह मंगेश फटांगरे व किरण रहाणे हे तिघे बुलेट मोटार सायकलवरुन तेथे आले व त्यांनी कासट बंधुंना दमदाटी व धमकी देत लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत अतुल कासट व त्यांचे धाकटे बंधु अमित दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी सदरची घटना शहरात समजताच भाजपसह व्यापारी वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला. माहेश्वरी समाजासह संगमनेर व्यापारी असोसिएशनने या घटनेचा निषेध म्हणून मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदनही सादर केले. यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी या घटनेला तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे व उपनिरीक्षक शालोमन सातपुते जबाबदार असल्याचा घणाघात करीत ढुमणे यांच्या कृत्यांचा पाढाच वाचला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी ढुमणेंच्या कार्यपद्धतीवर बोटं ठेवून या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होण्याची गरज असताना सौम्य कलमान्वये झालेल्या तक्रारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे तालुका निरीक्षक प्रचंड अडचणीत सापडले होते.
त्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसतानाही त्यात हस्तक्षेप करुन थेट हाणामार्यापर्यंत वाद नेणार्या अमोल सरोदे, मंगेश फटांगरे, किरण रहाणे व अज्ञात 8 ते 10 जणांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून धडक देणार्या वाहनाच्या क्रमांकावरुन ‘त्या’ वाहनातील तरुणांचा शोध घेत त्यातील प्रथमेश धनंजय जाधव (वय 19), संदीप राजाराम जाधव (वय 18), जयेश बंडू भोर (वय 22) व गणेश भीमराव लोणे (वय 22, सर्व रा.पिंपळगाव खांब, जि.नाशिक) या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यासोबतच घटनेच्यावेळी हजर असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याला अहिल्यानगरच्या बाल न्याय समितीसमोर हजर केले जाणार आहे.
या प्रकरणात धडक झालेल्या दोन वाहनांमधील तरुणांमध्ये संभाषण सुरु असतानाच टोलनाक्यावरील अमोल सरोदे हा आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला व त्याने कासट बंधुंवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी आसपासच्या ठिकाणाहुन आलेल्या काहीजणांची साथही त्यांना मिळाली. शिवाय टोलवरील कर्मचारी आपल्या बाजुने भांडताहेत हे पाहुन धडक देणार्या वाहनातील तरुणांनीही सरोदेच्या टोळीत सहभागी होत कासट यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. खरेतर पोलिसांनी आपले संपूर्ण लक्ष सरोदे आणि त्याच्या टोळीवर केंद्रीत करुन त्यांना जेरबंद करण्याची गरज असताना नाशिकमध्ये जावून ‘धडक’ देणार्यांनाच अटक केल्याने अद्यापही पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे टोलनाक्याच्या प्रेमातच असल्याचे दिसत आहे.