खिंडीत अडकलेल्या ठाकरे सेनेला गटबाजीने पछाडले! पक्षप्रमुखांसमोरच प्रदर्शन; सत्कार टाळल्याने पदाधिकार्‍याच्या घरातच गृहकलह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करुन सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावरच ताबा मिळवल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अक्षरशः खिंडीत अडकले आहेत. या संपूर्ण घडामोडीतून सावरताना त्यांनी निष्ठावानांसह नव्याने पक्षबांधणी सुरु केली असताना अद्यापही पलायन करणार्‍यांसह पक्षातंर्गत गटबाजीचाही त्यांना सामना करावा लागत आहे. काँग्रेस वगळता संगमनेरात केवळ भाजप शिवसेनेची थोडीफार ताकद असल्याने गेल्याकाही वर्षात स्थानिक शिवसैनिकांची संख्याही वाढली आहे. मात्र शिवसेनेत दाखल झालेल्या प्रत्येकानेच आपली महत्त्वकांक्षा सर्वोच्च ठेवल्याने गटबाजीतून त्याचे दृष्य स्वरुपही आता दिसू लागले आहे. त्यातच पक्षाने खांदेपालट करताना पुन्हा एकदा जुन्या शिवसैनिकांवर विश्‍वास दाखवल्याने ‘हेतू’ ठेवून पक्षात दाखल झालेल्यांची घुसमट वाढू लागली आहे, त्यातून गटबाजीचे प्रदर्शन घडण्यासह पक्षाची शक्ति क्षीण करण्याचेही प्रकार घडू लागले असून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच स्थानिक शिवसेनेतील गटबाजीचे प्रदर्शनही घडले. विनोदाचा भाग म्हणजे ठाकरेंच्या संगमनेर भेटीच्यावेळी प्रत्येक गटाने स्वतंत्र सत्कारासाठी रिघ लावली होती, मात्र त्यांनी सत्कारात वेळ घालवू नये असे सांगत सत्कारच टाळल्याने हातात हार घेवून आपली ‘पाळी’ येण्याची शेवटपर्यंत वाट बघत ताटकळतच राहिलेल्या एका पदाधिकार्‍याच्या घरात मात्र त्यावरुन ‘गृहकलह’ही उफाळला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मोठी पडझड झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा सत्तेत आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पक्षाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी महिनाभरापूर्वी उत्तर नगरजिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात फेरबदल करताना ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा जुन्या व निष्ठावान शिवसैनिकांवर विश्‍वास ठेवताना उत्तरेतील बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. स्थानिक राजकारणामूळे मोठ्या कालावधीपासून अडगळीत गेलेल्या अशा अनेक शिवसैनिकांमध्ये त्यामुळे उत्साह संचारला असून पक्षाची पडझड रोखण्यासह पक्षवाढीसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु असताना ‘हेतू’ ठेवून पक्षात दाखल झालेल्यांची घुसमट वाढत आहे. त्याचा परिणाम खुद्द पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमातही गटबाजीचे उघड प्रदर्शन घडण्यात झाले असून संगमनेरातील ‘जनसंवाद’ यात्रेच्यावेळी आपला चेहरा दाखवण्यासाठी संकेत डावलून लागलेले फ्लेक्स, त्यावरुन झालेले वाद आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी पक्षप्रमुखांच्या सत्कारासाठी आजी-माजी पदाधिकार्‍यांसह काहींनी लावलेल्या रांगांमधून ते अधिक ठळकपणे बघायला मिळाले.


शिवसेनेशी संलग्न असलेल्या अशाच एका संघटनेचा जिल्हा पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी हार घेवून रांगेत उभा होता. त्यासाठी त्याने आपले संपूर्ण कुटुंबही सोबत आणले होते, कामधंदा सोडून त्यांना कार्यक्रमाला घेवून जाताना संबंधित पदाधिकार्‍याने आपल्या पदाची उंची आणि ठाकरेंशी असलेल्या जवळकीचा दाखला दिला होता. मात्र प्रत्यक्षात पहिल्या दोन-तीन सत्कारानंतरच गटबाजीची ‘मेख’ लक्षात आल्याने ठाकरे यांनी ‘सत्कारात वेळ घालवण्यासाठी आपण इथे आलो नाही’ असे सांगत उर्वरीत सत्काराला फाटा दिला. त्यामुळे ‘त्या’ जिल्हा पदाधिकार्‍याचे कुटुंब आपल्याच दादल्यावर संतावपले असून ‘तुम्हाला कोणी खात नाही’ असे म्हणतं घरातूनच त्याचा पानउतारा सुरु झाल्याने सुखात सुरु असलेल्या त्यांच्या संसाराला सध्या गृहकलहाने पछाडले आहे.


सन 1990 ते 2000 हा दहा वर्षांचा काळ संगमनेरात शिवसेनेचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. या कालावधीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येवून सभागृहात पोहोचणार्‍या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या चार/पाच असायची. त्यावेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह ही संख्या दोन आकडीच्या आसपास गेल्याचेही उदाहरण आहे. सन 2001 आणि 2016 साली थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेतही संगमनेर शहरातील मतदार शिवसेनेला संधी देण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून आले होते. मात्र याच कालावधीत अनेकांच्या महत्त्वकांक्षा वाढीस लागण्यासह काही मुखवट्यांनीही पक्षात प्रवेश केल्याने व नंतरच्या कालावधीत अशा काहींकडून जुन्या आणि निष्ठावन शिवसैनिकांची मनेही दुखावली गेल्याने गेल्या दीड दशकांत संगमनेरातील शिवसेना पक्ष अक्षरशः रसातळाला गेला होता. आजच्या स्थितीत संगमनेर नगरपालिकेत पक्षाचा एकही शिवसैनिक नाही यावरुनही ही गोष्ट स्पष्ट होते.


पक्ष फूटीनंतर यासर्व गोष्टींचा विचार करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी बदल केले. त्यात उत्तर नगरजिल्ह्याचा समावेश करताना मध्यंतरी अंतर्गत राजकारणातून दक्षिणेत पाठवण्यात आलेल्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पुन्हा उत्तरेत बोलावून जुन्या शिवसैनिकांचा संच जुळवण्यात आला. त्यामुळे उत्तरेतील बहुतेक सर्वच तालुक्यातील निष्ठावानांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होवून चैतन्य निर्माण होत असतांनाच आता ‘महत्त्वकांक्षा’ आणि ‘स्वविकास’ साधण्यासाठी पक्षात आलेल्यांची घुसमट वाढली आहे, त्याचा परिपाक पक्षातंर्गत गटबाजी वाढण्यात झाला असून एकमेकांच्या अंगावर शितोंडे उडवण्याचे प्रकारही यातून समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संगमनेरातील हा प्रकार पक्षप्रमुखांच्या जनसंवाद यात्रेदरम्यानच समोर आल्याने स्थानिक शिवसेनेच्या अंतरंगाचे त्यांनाही दर्शन घडल्याचे समजले जाते.


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘जनसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधीत आहेत. त्यांच्या या दौर्‍यातून पक्षातील गटबाजीला आळा बसून ठिकठिकाणचे शिवसैनिक उत्साहित होवून पक्षवाढीचा कार्यक्रम राबवतील असे त्यांना अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आदित्य ठाकरे नाशिकमध्ये असतांना उपनेते बबन घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र घडण्यासह खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासमोरच गटबाजीचे उघड प्रदर्शन झाल्याने या यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेने संगमनेरातून काय साधले? असा सवाल विचारला जावू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *