अर्थसंकल्पाच्या प्रतिक्रियेतून उमटला संगमनेरचा राजकीय विरोधाभास! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची टीका; तर, सत्यजीत तांबे यांच्याकडून केंद्रीय अर्थमंत्र्यांचे कौतुक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून उद्योजकापासून सर्वसामान्य माणसापर्यंत कोणाला काय मिळाले याची सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच नेहमीच राजकीय ‘संशयात’ वावरणार्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या अर्थसंकल्पीय प्रतिक्रियेने मात्र राजकीय वर्तुळाच्या भुवयां पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. आपल्या प्रतिक्रियेत आमदार तांबे यांनी ‘आकड्यांपेक्षा राजकीय आत्मविश्वासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प!’ अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मांडणी कौशल्याचे भरभरुन कौतुक केले. विरोधाची परंपरा धुडकावून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वरकरणी उत्स्फूर्त वाटत असली, तरीही त्यातून दूरच्या राजकारणाचे संकेत मात्र लकाकत आहेत. त्याचवेळी माजीमंत्री आणि त्यांचे मामा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र ‘शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी निराशाजनक’ आणि ‘हरलेल्या डावाचा मीडियाच्या साथीने जयजयकार’ अशा तिखट शब्दात अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. थोरातांप्रमाणेच तांबेंकडूनही अशीच काही अपेक्षा असताना एकाच परिवारातील दोघा आमदारांच्या विरोधाभाशी प्रतिक्रिया राजकीय चर्चेचे कारण ठरल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (ता.१) विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही करवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने गरीब, महिला, तरुण व शेतकरी या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून विविध योजना व त्याच्या लाभांची घोषणा केली. केंद्राने राबविलेल्या विविध योजनांचे परिणाम सांगत त्यांनाही बळ देण्यात आले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी अमृतकाळात लक्ष्य समोर ठेवून विकास कामांचा रुट मॅपही सादर केला गेला. या अर्थसंकल्पात कोणालाही प्रलोभन दाखवण्यात आले नाही. मात्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च आणि पुढील उद्दिष्ट यावर मात्र अर्थमंत्र्यांचा भर दिसला. एकंदरीत सरकारने केलेल्या कामाबाबत मंत्रीमंडळ आश्वस्थ असल्याचे दाखवणारा हा अर्थसंकल्प होता.

याबाबत देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असताना परंपरेनुसार विरोधी गटातील नेत्यांनीही आपापल्या आकलनातून अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोटं ठेवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रावर टीका केली आहे. आज संपूर्ण मध्यमवर्ग महागाईने होरपळतोय, अशावेळी त्यांना दिलासा देण्याची गरज असताना सरकारने काहीही केले नाही. महागाई नियंत्रणात आणण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. शेतकरी व मध्यमवर्गीयांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्राने मीडियाला हाताशी धरुन हरलेल्या डावाचा जयजयकार सुरु केल्याची बोचरी टीकाही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सर्वांचीच घोर निराशा केल्याचे सांगत थोरात यांनी अर्थसंकल्पावरच शेअर बाजाराच्या घडामोडी अवलंबून असल्याचे व यावेळी बाजारच ठप्प असल्याचे सांगितले. आजवर शेतकर्यांना आम्ही मदत केल्याचे सरकार सांगत आले, प्रत्यक्षात शेतकर्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. राज्यांच्या हक्काचे निधीही केंद्राकडे थकीत आहेत, अर्थसंकल्पातून त्यांनाही दिलासा देण्याची गरज होती. मात्र सरकारने काहीच केले नाही, त्याचा परिणाम राज्यांना प्रगती साधणं अवघड होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

त्याचवेळी त्यांचे भाचे, नाशिक पदवीधर संघातून नाट्यमयरित्या अपक्ष निवडून आलेले आणि सुरुवातीपासूनच राजकीय संशयात वावरणार्या आमदार सत्यजीत तांबे यांनी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया देवून घरातीलच राजकीय विरोधाभास समोर आणला आहे. अर्थसंकल्पानंतर लागलीच आमदार तांबे यांनी समाज माध्यमांवर अर्थमंत्री सीतारमण यांच्या संसदेतील छायाचित्रासह ‘आकड्यांपेक्षा राजकीय आत्मविश्वासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प!’ अशा मथळ्याखाली पोस्ट लिहून त्यांनी राजकीय जाणकारांच्या डोक्याला पुन्हा मुंग्या आणल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये आमदार तांबे म्हणतात; ‘आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील १० वर्षांतील देशाच्या प्रगतीतील सकारात्मक आकडेवारी जाणीवपूर्वक मांडण्याचे आणि नकारात्मक आकडेवारी झाकण्याचे राजकीय चातुर्य दाखवले आहे.

कोणतीही ठोस नवी घोषणा न करता या आधीच्या योजनांचे यश मांडत अर्थमंत्र्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं केलं आहे. नवीन हॉस्पिटल्स, कॉलेजेस, नव्या योजना अशा घोषणा कोणत्याही पक्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात होत असतात, त्याची अंमलबजावणीही कमी जास्त प्रमाणात होतंच असते. मात्र निवडणूक असूनही कर पद्धतीची पुनर्रचना, विशिष्ट घटकांसाठी भरघोष तरतूद अशा कोणत्याही लोेकप्रिय घोषणा न करता, समतोल अर्थसंकल्प मांडला गेला आहे. यातून निवडणुकांना सामोरं जाताना सरकारचा राजकीय आत्मविश्वास दिसून येतो.’ अशा प्रकारची प्रतिक्रिया देवून पुन्हा एकदा राजकीय संशय निर्माण करतांना त्यांनी शेवटी ‘आता हा आत्मविश्वास आहे की, अतिआत्मविश्वास हे काळच ठरवेल..’ अशी कोपरखळी हाणताना भाजपला ‘फिलगूड फॅक्टर’ची आठवणही करुन दिली आहे. मात्र एकंदरीत आपले मामा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अगदी उलट दिलेल्या त्यांच्या या प्रतिक्रियेतून पुन्हा एकदा राजकीय संभ्रण निर्माण झाला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी तांबे पिता-पुत्रांनी राजकीय खेळी केली व ऐनवेळी सत्यजीत तांबे यांनी ‘अपक्ष’ उमेदवारी दाखल केली. निवडणूकपूर्व काळात घडलेल्या काही घडामोडींनी सत्यजीत तांबे भाजपात जातील असेही वातावरण निर्माण केले. भाजपानेही आपला उमेदवार टाळल्याने तांबेंबाबत संशय वाढला. प्रत्यक्षात त्यांनी अपक्षच विजय मिळवला. मात्र त्यानंतरही सभागृहात त्यांना मिळत गेलेली संधी, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल, अगदी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी आपल्याच नेत्याच्या सांगण्यावरुन झाली असे ठासून सांगणारे आमदार तांबे यांचे कार्यकर्ते, या सर्व घडामोडी त्यांचा राजकीय कल दर्शवणार्या आहेत. त्यातच आमदार सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पाबाबत दिलेली प्रतिक्रियाही सकारात्मक असल्याने येणार्या काळात संगमनेर मतदारसंघात उलथापालथ होण्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.

