वकील दाम्पत्याचा खटला जलद गती न्यायालयात चालवा! राहाता तालुका बार असोसिएशनचे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला अहमदनगर येथे जलद गती न्यायालयात चालवावा. या खून खटल्याचा तपास एसआयटी यंत्रणेकडून व्हावा, यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी, वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करावा, यासह इतर मागण्यांबाबत राहाता तालुका बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष नितीन विखे यांच्या नेतृत्वाखाली वकील बांधवांनी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

वकील बांधवांनी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील अ‍ॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची अमानुषपणे छळ करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निषेध नोंदवला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण वकील संघाने या घटनेच्या निषेधार्थ २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा ठराव मंजूर केलेला आहे.

वकील हे पक्षकार व न्यायालय यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात व आपल्या पक्षकाराची त्याने दिलेली माहिती व कागदपत्राच्या आधारे बाजू मांडून पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. परंतु वकिलांच्या जीवन संरक्षणाचा प्रश्न वरील घटनेतून निर्माण झालेला आहे. त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळावे, त्यासाठी वकील संरक्षण कायदा लागू होणे कायदेशीर गरजेचे आहे.

याचबरोबर आढाव दापत्याचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी नेमावी, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी, खून खटल्यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणेबाबत कारवाई करावी, अ‍ॅड. आढाव दाम्पत्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या यंत्रणेचा वापर करून गुन्ह्यासंबंधी संपूर्ण कागदपत्रे, पुरावे न्यायालयात सादर करावीत आदी मागण्या करण्यात आल्या असून याकरिता साखळी उपोषण सुरू केलेले आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.

शुक्रवारी (ता.२) वकील बांधव राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देणार आहेत. तसेच या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने कुठलाही कसूर ठेवू नये, वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करून लागू करावा, अशी मागणी करणार आहेत.
– अ‍ॅड. अनिल शेजवळ (माजी अध्यक्ष-राहाता बार असोसिएशन)

Visits: 15 Today: 1 Total: 115038

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *