संगमनेर आगारातील वाहकाची बस बाहेर निघताच मनःस्थिती बिघडली रुग्णालयात उपचार सुरू; आईची एसटी अधिकार्‍यांविरुद्ध पोलिसांत तक्रार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एसटी कर्मचार्‍यांचा संप मोडून काढून राज्यातील आगारांतून सेवा सुरू करण्यावर महामंडळाचा भर आहे. मात्र, त्यातूनही आता वेगळे प्रकार घडू लागले आहेत. संगमनेर आगारात शनिवारी (ता.11) अशीच एक घटना घडली. तेथे वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या वाहकास कामावर बोलावण्यात आले. मात्र, बस आगारातून बाहेर काढतानाच त्याची मन:स्थिती बिघडली आणि तो कोसळला. त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर त्याच्या आईने पोलीस ठाणे गाठून संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध तक्रार केली.

एसटीच्या संपामुळे संगमनेर आगारही बंद आहे. तेथील बसस्थानकात आंदोलन सुरू आहे. शनिवारी आगारातून बस सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी सूरज घोलप या वाहकाला कामावर बोलाविण्यात आले होते. मात्र, बस बाहेर काढली जात असतानाच तो चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची आई मनीषा शिवाजी घोलप यांनी संगमनेर पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी लेखी तक्रार दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे पती एसटीच्या सेवेत होते. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा सूरज अनुकंपा तत्वावर एसटीत वाहक म्हणून भरती झाला. त्याचे प्रशिक्षण झाल्यापासून तो घरीच होता. त्यावेळी त्याला कर्तव्य देण्यात आले नव्हते.

शनिवारी अचानक त्याला कामावर बोलाविण्यात आले. नोकरी टिकवायची असेल तर कामावर यावे लागेल, असे सांगून एसटीच्या अधिकार्‍यांनी त्याला जबरदस्तीने कामावर येण्यास भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे. संप सुरू असल्याने कामावर येताना त्याच्यावर प्रचंड दडपण आले. त्यामुळे तो चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर एसटीचे अधिकारी तेथून निघून गेले. त्यामुळे त्यामुळे त्याच्याकडे देण्यात आलेले एसटीचे तिकिट बुकिंग मशीन आणि तिकिटाचे जमा झालेले शंभर रुपये पोलीस ठाण्यात जमा करीत असल्याचे घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुलाला कामावर बोलाविणार्‍या अधिकार्‍यांची नावेही त्यांनी पोलिसांना दिली आहेत. मुलाच्या जीवाला धोका झाला तर या अधिकार्‍यांना जबाबदार धरावे, असेही घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी यासंबंधी अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद केलेली नाही. आगारातून एसटी बस सोडण्याचा महामंडळाचा प्रयत्न मात्र यामुळे फसला आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 27251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *