संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार चक्क ‘पोलीस उपअधीक्षकां’कडे! संगमनेरच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग; कनिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्तीच नसल्याने ‘पेच’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या इतिहासात ‘संवेदनशील’ म्हणून नोंद असलेल्या आणि आजच्या काळात आघाडीच्या शहरांमध्ये अग्रणी असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सध्या अभूतपूर्व प्रसंग अनुभवायला मिळत आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख सध्या तातडीच्या रजेवर आहेत. त्यातच शहर पोलीस ठाण्यात कनिष्ठ अधिकार्‍यांची वाणवा असल्याने पोलीस निरीक्षकांच्या अनुपस्थितीत शहराचा भार ‘वरीष्ठ’ असलेल्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनाच सांभाळावा लागत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून उपअधीक्षक कार्यालयाचा कारभारही शहर पोलीस ठाण्यातूनच सुरू असल्याचे ‘न भूतो न भविष्यती’ दृष्य संगमनेरकरांना सध्या अनुभवण्यास मिळत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर म्हणजे प्रागैतिहासापासून ते आजच्या सामाजिक चळवळीपर्यंत सतत अग्रणी राहिलेला तालुका. स्वातंत्र्यापूर्व काळात संगमनेरमधून अनेक आंदोलनांचा जन्मही झाला. त्यात मिठाचा सत्याग्रह असो, अथवा चले जाव चळवळ. या दरम्यान लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर या सारख्या अनेक विभूतींचा परीसस्पर्श या भूमीला झाला. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात मात्र ‘हिंदू-मुस्लिम’ आणि ‘जनता-प्रशासन’ अशा सततच्या संघर्षाने प्रगल्भ इतिहास असणार्‍या संगमनेर शहराची नोंद पोलीस दप्तरी ‘संवेदनशील’ म्हणून झाली आणि संगमनेरकडे बघण्याचा शासन आणि प्रशासनाचा दृष्टीकोन बदलत गेला.

मात्र गेल्या तीन दशकांत अपवाद वगळता संगमनेर शहरात जातीय हिंसाचार झाल्याचे ऐकीवात नाही. या कालावधीत संगमनेर शहराने आपल्यावरील जातीयतेचा डाग पुसून प्रगतीच्या दिशेने घोडदौड केली आणि त्याचे फळ अहमदनगरनंतर सर्वाधिक संपन्न शहर म्हणून संगमनेरचे नाव अग्रणी आले, ते आजही कायम आहे. अशा शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आजवर अतिशय गांभिर्याने घेतले गेले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र बदलले असून राज्यातील दिग्गज राजकारणी म्हणून परिचित असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरातील पोलीस ठाण्यातच अधिकार्‍यांची ‘टंचाई’ निर्माण झाली आहे. शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसह दोन सहाय्यक निरीक्षक व चार उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती असते.

मात्र मागील कालावधीत कनिष्ठ पातळीवरील चौघांच्या बदल्या झाल्या, तर दोन अधिकार्‍यांना कोविड संक्रमणामुळे रजेवर जावे लागले. त्यामुळे मागील प्रदीर्घ कालावधीपासून संगमनेर शहराची कमान एकट्या पोलीस निरीक्षकांच्या हातात आहे. त्याचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासासह गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यावर होत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. गेल्या आठवठ्यात तीनबत्ती चौकात पोलिसांवरच झालेला हल्ला याच गोष्टी अधोरेखीत करीत आहेत. मात्र तरीही बदलून गेलेल्या अधिकार्‍यांच्या जागेवर बदली अधिकारीच पाठवण्यात न आल्याने सद्यस्थितीत शहर पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांचीच वाणवा दिसू लागली आहे.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आरोग्यविषयक कारणाने तातडीच्या रजेवर गेले आहेत. सामान्यवेळी पोलीस निरीक्षकांच्या अनुपस्थितीत शहर पोलीस ठाण्याचा पदभार कनिष्ठ पातळीवरील सहापैकी एका अधिकार्‍याकडे दिला जात असत. यावेळी मात्र पदभार घ्यायला अधिकारीच नसल्याने तो कोणाकडे द्यावा असा ‘पेच’ पोलीस निरीक्षकांसमोर उपस्थित झाला होता. मात्र त्यांचे रजेवर जाणे तातडीचे असल्याने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी ‘तुम्ही जा, मी सांभाळून घेतो..’ असे सांगत त्यांनी आपला वरीष्ठतेचा मिजाज बाजूला ठेवून चक्क शहर पोलीस ठाण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.

मागील चार दिवसांपासून सकाळी 9 ते रात्री 1 वाजेपर्यंत ते स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थितीत असतात. यादरम्यान येणार्‍या तक्रारी, अडचणी सोडविण्यासह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचेही दिव्य ते दररोज पेलीत आहेत. उपअधीक्षक मदने यांच्या कार्यक्षेत्रात संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह तालुका, घारगाव, आश्वी या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांसह अकोले व राजूर पोलीस ठाणीही येतात. त्यामुळे शहराचे कामकाज सांभाळतांना त्यांना आपल्या ‘डिव्हिजन’ची व्यवस्था ठेवण्यासाठी एकप्रकारे शर्थ करावी लागत आहे.

पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी शहर पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळावे असा प्रसंग संगमनेर शहराच्या अलिकडच्या काळातील इतिहासात बहुधा पहिलाच असावा. या अभूतपूर्व प्रसंगाचा आणि उपअधीक्षक मदने यांच्यातील कर्तव्याप्रती कोणत्याही मर्यादा अथवा संकेत ओलांडण्याचा ‘न भूतो न भविष्यती’ अनुभव सध्या संगमनेरकर घेत आहेत. मागील चार दिवसांत दिवसातील 16 ते 18 तास ते काम करीत असल्याने अनेकांनी त्यांच्या समर्पित वृत्तीला सलामही केला आहे.

Visits: 5 Today: 3 Total: 30457

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *