मोर्चासाठी अकोलेतून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना मुस्लीम बांधवांनीही शुभेच्छा देत दर्शवला जाहीर पाठिंबा

नायक वृत्तसेवा, अकोले
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करीत आहेत. सरकारला दोनवेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. २०) हजारो मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत. यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून बांधव येत असताना अकोलेतूनही बुधवारी (ता. २४) मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज पाचवा दिवस आहे. नगरमध्ये मुक्काम केल्यानंतर ते पुणे येथे पोहोचले आहे. तेथून ते नवी मुंबईला जाणार आहे. या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झालेले आहे. याला बळ देण्यासाठी अकोलेतूनही मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे. बुधवारी सकाळी शहरातून मिरवणूक काढत आरक्षण मिळालचं असा जयघोष करुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक बांधव खासगी वाहनांनी देखील गेले आहे. दरम्यान, आंदोलकांना अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांसह मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा देत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी डॉ. संदीप कडलग, महेश नवले, भानुदास तिकांडे आदिंसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
