निर्बंध असूनही तब्बल बारा तास चालला संगमनेरचा विसर्जन सोहळा! उत्कृष्ट नियोजन; सलग तिसर्या वर्षी एकाही अप्रिय घटनेची नोंद नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड नियमांच्या अधीन राहून साध्या पद्धतीने साजर्या झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची रविवारी विसर्जनाने सांगता झाली. प्रशासनाने विसर्जन मिरवणूका काढण्यास मनाई केल्याने शहरात अपवाद वगळता ढोल-ताशांचा गजर कानी पडला नाही. मात्र त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. तब्बल बारातास चालेल्या विसर्जन सोळ्याला सकाळी साडेआठ वाजता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर गल्ली मंडळाच्या गणरायाची आरती करुन सुरुवात झाली. तर रात्री साडेदहा वाजता बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी शेवटच्या गणपतीचे पूजन करुन पुढच्यावर्षी लवकर या म्हणत बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. तीन वर्षांपूर्वी पत्रकार आणि प्रशासनाच्या समन्वयातून तयार झालेल्या नियोजनाचीच यंदाही अंमलबजावणी झाल्याने सलग तिसर्या वर्षी विसर्जनादरम्यान एकाही अप्रिय घटनेची नोंद झाली नाही.
मागील वर्षापासून राज्यात ठाण मांडून बसलेल्या कोविडचे संक्रमण अजूनही आटोक्यात नसल्याने राज्यात राजकीय वगळता सार्वजनीक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्या वर्षी तरुणाईच्या जल्लोशाचा उत्सव असलेला गणेशोत्सव साजरा झाला. या उत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंडळांना पारंपरिक पद्धतीने श्रींची स्थापना करण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र देखावे सादर करण्यास व गर्दी जमवून दररोजची पूजा-अर्चना करण्यास व स्थापनेसह विसर्जनानिमित्त निघणार्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती. या नियमांना अधीन राहूनच संगमनेरात अत्यंत भक्तीभावाने हा उत्सव साजरा करण्यात आला.
संगमनेरच्या गणेशोत्सवाला सव्वाशेहून अधिक वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे येथील गणेशोत्सवाला जिल्ह्यात सर्वाधीक महत्त्व आहे. दरवर्षी संगमनेरातून निघणारी मुख्य विसर्जन मिरवणूकही जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र ठरत असते. मात्र यावर्षीही मिरवणूकांना परवानगी नसल्याने मानाच्या गणेश मंडळांनी गणपती बाप्पा मोरयाऽ, पुढच्या वर्षी लवकर या.. च्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे पूजन केले. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर व अधिकारी वर्गासह परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी नदीपात्रात होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी प्रशासन आणि पत्रकार यांच्या समन्वयातून ‘अॅक्शन प्लॅन’ तयार झाला होता. तहसीलदार अमोल निकम यांनी 2019 साली त्याची पहिल्यांदा अंमलबजावणी केली. तेव्हापासून विसर्जनाच्या दिवशी एकही बुडीताची घटना झाली नाही. अर्थात या प्रक्रीयेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची समर्पित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या नियोजनानुसार कोणालाही थेट नदीपात्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होवून संसर्ग वाढू नये यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब व एकविरा फाऊंडेशनच्या सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संगमनेर नगरपालिकेने शहरात चार ठिकाणी कृत्रिम हौद तर सोळा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. येथे जमा होणार्या मूर्ती नदीकाठी नेवून बजरंग दलाच्या ताब्यात देवून त्यांचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जनाच्या निमित्ताने नदी वाहती असली तरीही त्यात पुरेसा प्रवाह नसल्याने बजरंग दलाने तराफा तयार करुन खोल पाण्यात जावून सगळ्या बाप्पांचे विसर्जन केले. काही नागरिकांनी आपणच आपल्या बाप्पांचे विसर्जन करावे या भावनेतून संगमनेरचा प्रवरा काठ सोडून वाघापूर, संगमनेर खुर्द, खांडगाव, कासारवाडी, मंगळापूर व थेट धांदरफळच्या रामेश्वर मंदिरालगतच्या नदीपात्रात जावून वर्षभर अथवा दहा दिवस पूजलेल्या आपल्या बाप्पांचे मनोभावे विसर्जन केले व पुढच्या वर्षी लवकर येण्याचा घोष केला. संगमनेरच्या नदीपात्रात एकूण 54 सार्वजनिक गणेश मंडळे, एक खासगी व बारा एक गाव, एक गणपतींसह हजारो घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन पार पडले. जवळपास बारा तास चाललेल्या या सोहळ्या दरम्यान एकाही अनुचित अथवा अप्रिय घटनेची नोंद झाली नाही.