कत्तलीच्या व्यवसायावर गदा आल्याने चौघांनी निवडला मार्ग? संगमनेरच्या ‘ड्रग्ज’ प्रकरणाला नवे वळण; ‘एलसीबी’कडून ‘त्या’ तिघांचाही गुन्ह्यात समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांविरोधात सातत्याने व्यक्त होणारा रोष आणि त्यातून निर्माण होणारी कायदा-सुव्यस्थेची स्थिती यामुळे गेल्या वर्षभरात शहरातील गोवंश कत्तलीचा व्यवसाय जवळजवळ थंडावला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कसायांकडून अन्य व्यवसायांचा शोध घेतला जात असताना भारतनगरमधील चौघांनी मिळून बेकायदा व्यवसायाला बेकायदा व्यवसायाचाच पर्याय  निवडून ‘मेफेड्रोन’ (एमडी) तस्करीचा नवा धंदा सुरु केल्याची नवीन माहिती गुन्ह्यात समोर आली आहे. या प्रकरणात यापूर्वीच एलसीबीच्या अटकेत असलेल्या तौसिफ कुरेशीने ‘त्या’ तिघांसह आपण या व्यवसायात असल्याची माहिती दिल्याने फसवल्याचा आरोप झालेल्या कासिफ कुरेशीच्या गुन्ह्यात या तिघांचाही समावेश करण्यात आला आहे. उर्वरीत दोघे अद्यापही पसार असून अटकेतील आरोपीची कोठडी संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करुन वाढीव कोठडीची मागणी केली जाणार आहे. ‘तौसिफ’च्या माहितीने या प्रकरणातील ‘गुढ’ वाढले असून ‘ड्रग्ज’चे व्यसन असलेला कासिफ या तिघांसह तस्करीत सामील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पसार असलेल्या दोघांची अटकही महत्वाची ठरणार असून त्याशिवाय या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता नाही. मात्र या प्रकरणाच्या तपासातून गुन्ह्यालाच ‘वळण’ मिळाल्याने नवा ‘संशय’ही निर्माण झाला आहे.


गेल्या 3 सप्टेंबर रोजी संगमनेर बसस्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रकटीकरण शाखेने छापा घालूप कासिफ असद कुरेशी (वय 27, रा.भारतनगर) याच्या ताब्यातील मोपेडमधून 39 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अतिशय घातक अंमलीपदार्थ जप्त केला होता. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीसह त्याच्या वडिलांनी सुरुवातीपासून कारवाईवर संशय घेवून हा प्रकारच बनावट असल्याचा दावा केला. असद कुरेशी यांनी तर, बसस्थानकासह अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रणही मिळवले व त्या आधारे अटक झालेल्या त्यांच्या मुलाचा घरापासून पोलीस ठाण्यापर्यंत झालेला प्रवासही थेट पोलीस अधीक्षकांच्या दरबारी मांडला. त्यांच्या त्याच तक्रारीत तौसिफ ताहेर कुरेशी, गुलाम फरीद गुलाम साबीर कुरेशी आणि इम्रान सत्तार सौदागर या तिघांची नावे समोर आली आणि त्यांनीच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्याशी संगनमत करुन षडयंत्र रचल्याचा व त्यात आपल्या मुलाला फसवल्याचा गंभीर आरोपही केला गेला.


त्यावर अपर अधीक्षकांनी केलेल्या चौकशीत गुन्ह्याच्या केंद्रस्थानी मोपेडमध्ये ‘एमडी’ची पुडी ठेवल्याचा आरोप असलेला तौसिफ कुरेशी आला. तो देखील ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या संगनमतात सहभागी असल्याच्या आरोप असल्याने त्यांनी संगमनेर ड्रग्ज प्रकरण थेट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवले. त्यांनीही आपले संपूर्ण लक्ष ‘तौसिफ’वर केंद्रीत करुन त्याचा शोध सुरु केला. या दरम्यान वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सांवत यांची मुख्यालयात बदली झाली. गुन्हेशाखेने घटनेपासूनच पसार झालेल्या तिघांमधील तौसिफ कुरेशीला नेवासाफाट्यावरुन जेरबंद केले, दरम्यानच्या काळात ड्रग्ज तस्करीची माहिती देणारा ‘त्रयस्त’ असल्याचे मात्र त्याचे नाव घेणं अडचणीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावरुन ‘त्या’ उपनिरीक्षकाला वाचवण्याचा प्रकार असल्याचाही संशय निर्माण झाला.  


मूळ घटनेत अडकवण्यात आल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात प्रत्यक्ष पोलिसांचा छापा पडण्यापूर्वी तौसिफ कुरेशी ‘त्या’ मोपेडवर बसून बरेच चाळे करतानाही दिसत असल्याने त्यानेच ‘त्या’ वाहनात ड्रग्ज ठेवल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र मूळ आरोपी बसस्थानकावर येण्यापूर्वीपासून संशयीत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, त्यांची टोळी आणि ‘ते’ तिघेही त्याच ठिकाणी असल्याने आणि एलसीबीने आरोपी केलेल्या तिघाही जणांशी त्यांचा कारवाईपूर्वी आणि नंतरही स्नेहपूर्ण संवादही बरेचकाही सांगणारा आहे. मात्र सुरुवातीला पोलिसांनी खबर देणारा ‘तिसराच’ असल्याचे चित्र उभे करताना या प्रकरणाचा संपूर्ण संशयच ‘त्या’ तिघांकडे वळवला.


त्यातही तौसिफच्या अटकेनंतर मोठे वळण मिळालेल्या या प्रकरणात कासिफ कुरेशीच्या वडिलांनी त्याच्याच सांगण्यावरुन तयार केलेल्या घटनाक्रमात आणि दिलेल्या डिजिटल पुराव्यात ‘त्या’ तिघांवर पोलिसांशी संगनमताचा आरोप केलेला असताना आता ‘त्या’ तिघांसह त्यांचा मुलगाच ड्रग्ज तस्करीच्या टोळक्यात सहभागी असल्याचे पोलिसांकडून सांगितले जावू लागल्याने नवे आश्‍चर्य निर्माण झाले आहे. त्यासाठी या चौघांच्याही पूर्वीच्या गोमांस विक्रीच्या व्यवसायाचा हवाला दिला जात असून सध्या संगमनेरातील गोवंश कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याने या चौघांनी भागीदारीतून मेफेड्रोन तस्करीचा धंदा सुरु केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


त्यातून ‘कत्तलखाने’ बंद असल्याचे भासवून दुहेरी पाठ थोपटून घेण्याचाही प्रयत्न दिसून येतो. शिवाय या प्रकरणातून पोलीस उपनिरीक्षकावरील फोकस आता तौसिफ आणि त्याच्या खांद्यावरुन पसार असलेल्या इम्रान सौदागरवर टाकला गेल्याने या प्रकरणाचा शेवट वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या दुग्धाभिषेकाने होणार असल्याचे व त्या निमित्ताने ‘त्या’ तिघांसह चौघांचा बळी दिला जाणार असल्याचेही आता समोर येवू लागले असून या प्रकरणातील गुंता वाढवला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जरीही अन्य यंत्रणेकडून होत असला तरीही त्यात पोलिसांची कातडी वाचवण्याचाच प्रयोग सुरु असल्याची जोरदार चर्चाही आता सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अडकवल्याचा दावा असलेल्या कासिफ कुरेशी अंमलीपदार्थांचा व्यसनी असल्याचे बोलले जाते, मात्र त्याने त्याची विक्री केल्याचे सांगणारा एकहीजण अद्याप पडद्यावर आलेला नाही, त्यामुळे या प्रकरणावरील संशयाचे मळभ आजही कायम आहेत.

संगमनेरच्या ड्रग्ज प्रकरणात थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या सहभागाचा गंभीर आरोप झाल्याने संगमनेरच्या पोलिसांची अब्रु वेशीवर आली आहे. त्यातून सावरण्याची कवायतही सुरु असून या प्रकरणाचा तपास थेट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला गेला आहे. त्यांनीही गेल्या आठ दिवसांत फसवल्याचा आरोप असलेल्या आरोपीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीतील ‘त्या’ तिघांवरच लक्ष केंद्रीत करुन त्यातील एकाच्या अटकेसह या प्रकरणात सध्या बेरोजगार असलेल्या चौघा कसायांची टोळी असल्याचे चित्र रंगवले गेले आहे. त्यासाठी येथील कत्तलखान्यांवरील सातत्यपूर्ण कारवायांतून कसायांचे कंबरडे मोडल्याचे आणि नैराश्यातून त्यातील काही अन्य अवैध मार्गाकडे वळत असल्याचेही अभासी चित्र दाखवले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरच संशय निर्माण झाला असून एकमेकांना अडकवण्याच्या ‘त्या’ चौघांच्या चर्चेत वादग्रस्त पोलीस उपनिरिक्षकाचे नाव मात्र अलगद बाजूला काढले जात आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 2148554

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *