राहुरी कोविड सेंटरमध्ये घरच्यासारखी सेवा मिळेल ः तनपुरे

राहुरी कोविड सेंटरमध्ये घरच्यासारखी सेवा मिळेल ः तनपुरे
बालाजी मंदीर ट्रस्टच्या मंगल कार्यालयात कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोना रुग्णसंख्या घटत असली, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेची आहे. ‘राहुरी डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ तज्ज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय सुविधांसह सज्ज असून, येथे कोरोना रुग्णांना घरच्यासारखी सेवा मिळेल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


नामदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे बालाजी मंदीर ट्रस्टच्या मंगल कार्यालयात उभारलेल्या राहुरी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.शरद धावडे होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, सुरेश वाबळे, निर्मला मालपाणी, धनराज गाडे, नगराध्यक्षा अनिता पोपळघट, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, नंदकुमार गागरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे उपस्थित होते.


पुढे बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, कोरोनाचा त्रास अंगावर काढणे जीवघेणे ठरत आहे. तरुणांमुळे घरातील वृद्ध बाधित होत आहेत. राहुरी, देवळाली प्रवरा व वांबोरी येथे प्रशासनाने विनामास्क फिरणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. पालिकेस घरकुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. वर्षभरात लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल. मागील 10 वर्षांत ग्रामीण भागात रस्त्याची कामे झाली नाहीत, ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असेल. राहुरी महाविद्यालयातील कोविड सेंटरला माझ्या शुभेच्छा आहेत; परंतु त्याच्या उद्घाटनप्रसंगी माझ्यावर राजकीय टीका उचित नव्हती. ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करीत आहेत, असा टोला मंत्री तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना लगावला. डॉ.जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर ज्ञानेश्वर बाचकर यांनी आभार मानले.

Visits: 179 Today: 1 Total: 1868100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *