लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी एक हजार खाटांचे चौदा अलगीकरण कक्ष! संगमनेर तालुक्यातील कोविडचा संसर्ग वाढल्याने तहसीलदारांनी केल्या इमारती अधिग्रहित..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुसर्या कोविड संक्रमणाचा सामना करणार्या अहमनगर जिल्ह्यातील कोविड स्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत आहे. अशा स्थितीत एकीकडे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे बाधित रुग्णाला समाजापासून दूर ठेवण्याचीही कवायत सुरु करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी शहरातील दोन इमारतींसह एकूण चौदा इमारती अधिग्रहित केल्या असून तेथे लक्षणे नसलेल्या मात्र प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या लक्षणे नसणार्या रुग्णांना ठेेवण्यात येणार आहे. यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना याच केंद्रामध्ये रहावे लागणार आहे.
गेल्या महिनाभरापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा संसर्ग पुन्हा एकदा भराला आला आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. त्यातच सध्याच्या कोविड संसर्गात लक्षणे नसलेल्या रुग्णांचा भरणा अधिक असल्याने दिवसोंदिवस कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांतील रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यातून जवळपास हद्दपार झालेली कन्टेन्मेंट क्षेत्राची (प्रतिबंधित) अंमलबजावणी पुन्हा जोमाने सुरू झाली असून ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या अशा ठिकाणांमधून कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यावर प्रतिबंध करता यावेत यासाठी संगमनेरच्या स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील दोन इमारतींसह तालुक्यातील चौदा ठिकाणे अधिग्रहित केली असून या इमारतींमध्ये आता लक्षणे नसलेल्या जवळपास 960 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्याने सुरु झालेल्या तालुक्यातील या सर्व कोविड केंद्रांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची नियुक्तिही करण्यात आली आहे. त्यानुसार संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयात (75 खाटा) व संगमनेर नगर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात (40 खाटा) अशा एकूण 115 जणांची व्यवस्था करण्यात आली असून या दोन्ही केंद्रांची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मच्छिंद्र साबळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
याशिवाय कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असलेल्या अन्य बारा ठिकाणीही अशीच केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात घुलेवाडी येथील आदिवासी मुलांचे वसतीगृह (डॉ.सतीश चांदुरकर, 250 खाटा), मांची हिल येथील अश्वीन रुरल आयुर्वेद महाविद्यालय (डॉ.तैय्यब तांबोळी, 200 खाटा), साकूर येथील शासकीय आश्रमशाळा (डॉ.वैरागर, 160 खाटा), अकलापूर येथील शासकीय आश्रमशाळा (डॉ.अमोल भोर, 50 खाटा), जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (डॉ.मेहजबीन तांबोळी, 50 खाटा), बोटा येथील जिल्हा परिषद शाळा (डॉ.सतीश कापसे, 30 खाटा), घारगाव येथील जिल्हा परिषद शाळा (डॉ.रविंद्र ढेरंगे, 30 खाटा), तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा (डॉ.भाऊसाहेब डामसे, 30 खाटा),
चंदनापुरी येथील जिल्हा परिषद शाळा (डॉ.निर्मला कवटे, 25 खाटा), सारोळे पठार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (डॉ.प्रल्हाद वांबळे, 10 खाटा), वरुडी पठार येथील आयुर्वेद दवाखाना (डॉ.प्रशांत शेलार, पाच खाटा) व जवळे बाळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (डॉ.विनायक दारुंटे, चार खाटा) अशा एकूण 959 लक्षणे नसलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांना याच कोविड केअर सेंटरमध्ये रहावे लागणार आहे.