वर्षभरात संगमनेरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट! तपासाच्या टक्केवारीतही सुधारणा; मात्र अवैध व्यवसाय फोफावले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही वर्षांत सतत चर्चेत राहिलेल्या संगमनेर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय घट झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या तर प्राणांतिक अपघात आणि महिला छेडछाडीच्या घटनांमध्ये मात्र वाढ झाली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासातही पोलिसांची कामगिरी किंचित सुधारली असून वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमधून जातीय तणावासारख्या घटनाही टळल्या आहेत. मात्र त्याचवेळी जुगार, बेकायदा दारुसह अन्य तत्सम बेकायदा उद्योगांमध्ये भर पडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सरत्या वर्षात संगमनेर पोलिसांनी एकीकडे समाधानकारक कामगिरी बजावली असताना, दुसरीकडे अवैध व्यवसायांच्या वाढीने त्याला डागही लागला आहे.
गेल्या वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना, अन्य मुद्देमाल चोरीचे प्रकार, दंगल व त्यातून दुखापत होण्याच्या घटना, बलात्कार अशा घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी शहर हद्दीत खून व खुनाच्या प्रयत्नाचे ११ गुन्हे घडले होते, यावर्षी केवळ एका खुनाच्या घटनेसह सात घटना समोर आल्या आहेत. यावर्षी शहरात दरोड्याच्या दोन घटना घडल्या तर दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी तीन टोळ्या पकडल्या. जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये किंचित तर मोटारसायकल व अन्य मुद्देमाल चोरीच्या घटनांमध्ये मात्र २९२ गुन्ह्यांची मोठी घट नोंदविली गेली आहे.
शहर पोलिसांच्या हद्दीतील रस्ते अपघाताच्या घटना चिंताजनक असून वर्षभरात अपघाताच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरात महिलांचा विनयभंग केल्याच्या एकूण ३२ तक्रारी दाखल झाल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात पाच गुन्ह्यांची भर पडली आहे. एकंदरीत पोलिसांच्या भाषेत गंभीर गुन्ह्यांचा समावेश असलेल्या भाग एक ते पाचच्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा २५ टक्के गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट नोंदविली गेली आहे. एकीकडे गुन्हे घडण्याची आकडेवारी कमी झालेली असताना दुसरीकडे त्याचा तपास लागण्याची गती किंचित वाढल्याचे दिलासादायक चित्रही वर्षाच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. मागील वर्षभरात गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण ५०.६६ टक्के होते, त्यात यंदा आणखी सुधारणा झाली असून शहर पोलिसांनी वर्षभरात ५३.८८ टक्के गुन्ह्यांचे तपास पूर्ण केले आहेत.
मागील ३६४ दिवसांत अनेक प्रसंगातून शहरातील जातीय सलोखा अडचणीत येण्याच्या घटनाही समोर आल्या. मात्र पोलिसांनी सीआरपीसीच्या तरतुदींचा वापर करुन मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया केल्याने स्फोटक स्थिती निर्माण होवूनही शहरातील वातावरण दूषित झाले नाही. वर्षभरात पोलिसांनी वेगवेगळ्या घटना आणि अवैध धंद्यांवर ८८५ कारवाया केल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या पन्नास टक्क्यांहून अधिक आहेत. याशिवाय या कारवाईत कॅफे हाऊस, वेगवेगळ्या लॉज व हॉटेलमध्ये धाडी घालून उघड केलेल्या अनैतिक प्रकारांचाही समावेश आहे.
एकीकडे अपवाद वगळता गंभीर गुन्ह्यांचा आलेख खाली आलेला असताना दुसरीकडे मात्र पोलिसांच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण करणारीही आकडेवारी समोर आली आहे. मागील वर्षी जुगार अड्ड्यांवरील छापेमारीच्या ३९ तर दारुबंदीच्या ७३ कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सरत्या वर्षात २४ घटनांची वाढ झाली. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव व जीवितास धोका निर्माण होईल अशा वेगवेगळ्या कृत्याच्या घटनांमध्येही २९ गुन्ह्यांची वाढ झाली. एकंदरीत भाग सहामध्ये मोडणार्या अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६४ टक्क्यांची मोठी वाढ होवून वर्षभरात ४१९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यावरुन शहरातील गंभीर गुन्ह्याच्या घटना खालावल्या असल्या तरीही, हद्दीतील अवैध व्यवसायांची मात्र भरभराट झाल्याचेही दिसून येते.
संगमनेर शहरातील घरफोडी, मोटारसायकल, अन्य चोरी व चोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ३०३ घटना कमी घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस आपली पाठ थोपटण्यात मश्गुल असले तरी वास्तवात घरफोडीच्या ३७ घटनांमध्ये अवघ्या पाच, मोटारसायकल चोरीच्या १५१ घटनांमध्ये अवघ्या २४, इतर चोरीच्या ८३ घटनांमध्ये केवळ १४ आणि चोरीच्या २३४ घटनांमधील केवळ ३८ प्रकरणांचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.