लव्ह जिहाद प्रकरणातील ‘मोहर्या’ला कायदेशीर ‘सापटी’चा आधार! घारगावच्या तरुणीचे मंचरमधून अपहरण; तिघांसह दोन वर्षांपासून आहे फरार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी पठारभागातील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचे मंचरच्या बसस्थानकावरुन बळजबरीने अपहरण करुन मुंबईत तिचे धर्मांतरण आणि शारीरिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. त्यावरुन संगमनेरातील वातावरण तापल्यानंतर घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीसह तिचे अपहरण करणार्या आरोपीला मुंबईतून आणले. मात्र या प्रकरणी तीन आठवड्यांनी तक्रार दाखल झाली. त्यामुळे अटकेची भीती निर्माण झाल्याने प्रकरणातील सहाही आरोपींनी वेगवेगळ्या वाटांनी पलायन केले. या संपूर्ण षडयंत्रात सूत्रधार म्हणून समोर आलेल्या युसुफ चौगुले याला त्याच दिवशी श्रीरामपूरातून अटक झाली, मात्र त्याने मोहरा म्हणून वापरलेल्या शादाब तांबोळीसह उर्वरीत पाचही जण फरार झाले. कालांतराने त्यातील दोघांना अटक झाली, मात्र शादाबसह अन्य दोघे दोन वर्षांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अशातच गेल्याकाही दिवसांपासून पोलिसांच्या मुखी फरार असलेला आणि अंतरिम जामीनावरील प्रलंबित सुनावणीच्या कारणाने निर्माण झालेल्या ‘सापटी’चा आधार घेत शादाब सोशल माध्यमात सक्रिय झाला आहे. मात्र त्याची ही कृती तालुक्यात रोष निर्माण करणारी ठरत असून घारगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

संपूर्ण राज्यात खळबळ उडवणार्या घारगावच्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात मूळच्या पठारभागातील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचे मंचरमधून अपहरण आणि नंतर तिचे धर्मांतरण करुन शारीरिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. 7 ते 9 जुलै 2024 दरम्यान घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्याचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. संगमनेरातील विविध हिंदुत्ववाद्यांनी या विषयावर रान पेटवल्याने तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करुन पीडितेसह तिला पळवून नेणार्याला मुंबईतील नालासोपार्यातून घारगावमध्ये आणले. मात्र दरम्यानच्या कालावधीत आरोपींनी धर्मांतरणासाठी पीडित तरुणीचा मानसिक छळही केल्याने तिची प्रकृती ढासळल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले गेले.

घटनेनंतर 20 दिवसांनी 27 जुलै 2024 रोजी पीडित तरुणीने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित मुलगी अल्पवयीन असतानाच घारगाव परिसरात राहणार्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक असलेला युसुफ दादा चौगुले याने परिसरातील शादाब रशीद तांबोळी याचा मोहर्यासारखा वापर करुन ‘लव्ह जिहाद’चे षडयंत्र उभे केले. मात्र सदरचा प्रकार महिनाभरातच मुलीच्या घरापर्यंत पोहोचल्याने वादावादी होवून त्यावर पडदा टाकण्यात आला. त्यानंतरच्या काळात दोघांनीही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र दहावीनंतर पीडित मुलगी पुढील शिक्षणासाठी संगमनेरात येताच काहीकाळ थंड झालेले षडयंत्र पुन्हा शिजायला सुरुवात झाली.

आरोपी शादाब तांबोळी त्याचा साथीदार आणि अद्यापही त्याच्यासोबतच फरार असलेल्या कुणाल विठ्ठल शिरोळेसह पीडित मुलीच्या वसतीगृहासमोर चकरा मारु लागला. शिरोळेने मध्यस्थी करुन एकदातरी त्याच्याशी बोलण्याचा आग्रह करुन तिला संगमनेरातील ‘बहुचर्चित’ कॅफेमध्ये आणले व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी अंगलट करुन पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून त्याची छायाचित्रेही काढली. नंतरच्याकाळात त्यांचाच वापर करुन शादाबने पीडितेला त्याच्याशी प्रेमसंबंध कायम ठेवण्यास भाग पाडले. वर्षभर हा प्रकार सुरु राहिल्यानंतर पीडित मुलगी संगमनेरातील शिक्षणसंस्थेतून पुण्यातील महाविद्यालयात शिकण्यासाठी गेली. मात्र आरोपीने तेथेही तिचा पीच्छा सोडला नाही. या कालावधीत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या युसुफ चौगुलेनेही पीडितेला समजावण्याचे नाटकं करुन शादाबशी संबंध कायम ठेवण्यास तिला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पीडित मुलगी शादाबशी कोणतेही संबंध ठेवण्यास राजी नसल्याने अखेर तिने वारंवार फोन केल्यास अथवा भेटण्याचा प्रयत्न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर या दोघांकडून सतत सुरु असलेला तगादा थांबला, पण म्हणून षडयंत्र थांबले नाही. सूत्रधार चौगुलेने ‘प्लॅन-बी’ कार्यान्वीत करुन महिन्याभरातच शादाबकरवी पीडितेला मंचर बसस्थानकावर ‘शेवटचे बोलण्याच्या बहाण्याने’ बोलावले. तेथे आधीपासूनच युसुफच्या कारमध्ये बसलेल्या शादाबने तिला इच्छा नसतानाही बोलण्यासाठी म्हणून कारमध्ये बसवले. बोलण्याच्या बहाण्यात कार घेवून पुण्याकडे प्रवासही सुरु केला. तिने विरोध करताच मारहाण, शिवीगाळ आणि नंतर जणू मायेने पाणीच पाजत असल्याच्या आविर्भावात युसुफने पाण्याच्या नावाखाली गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध करुन शादाबसह तिचे अपहरण घडवून आणले.

संपूर्ण नियोजन करुन आखलेल्या या कटात चाकणमध्ये पीडितेला अमर मेहबूब पटेल (वय 29, रा.साकूर) याच्या दुसर्या कारमधून मुंबईकडे पाठवण्यात आले. यावेळी त्यांच्यात कुरकुंडीचा आयाज अझीम पठाणही सामील झाला. सूत्रधार चौगुले चाकणमधून माघारी परतला. या प्रकरणातील मोहरा शादाब तांबोळीने 7 जुलैरोजी बेशुद्ध अवस्थेतील पीडितेला ठरल्याप्रमाणे नालासोपार्यात नेले. अदिल शब्बीर सय्यद (वय 36, रा.घनसोली) याने त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. दुसर्या दिवशी दोघांनाही एका मशिदीत नेवून पीडितेचे बळजबरीने धर्मांतरण घडवण्यात आले. तेथून पुन्हा लॉजवर परतल्यानंतर आरोपी शादाबने आता आपला निकाह झाल्याचे सांगत रात्रभर तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. मात्र या घटनेने संगमनेरात जातीय तणाव निर्माण झाल्याने पोलिसांच्या दबावातून सूत्रधार युसुफ चौगुले याला दोघांनाही घारगाव पोलिसांसमोर हजर करावे लागले आणि या षडयंत्राचे बिंग फूटले.

घटनेनंतर 20 दिवसांनी घारगाव पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ दादा चौगुले (वय 30), शादाब रशीद तांबोळी व कुणाल विठ्ठल शिरोळे (तिघेही रा.घारगाव), अदिल शब्बीर सय्यद (वय 36, रा.घनसोली), आयाज अझीम पठाण (रा.कुरकूंडी) व अमर मेहबूब पटेल (वय 29, रा.साकूर) अशा सहाजणांवर अपहरण, पोक्सो, अत्याचारासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सूत्रधार युसुफ दादा चौगुले याच्या श्रीरामपूरातून मुसक्या आवळल्या. तेव्हापासून नऊ महिने तो या प्रकरणात कारागृहात कैद होता. तर नंतरच्याकाळात मुंबईच्या अदिलसह साकूरच्या पटेलला अटक होवून त्यांचीही जामीनावर सुटका झाली. मात्र या प्रकरणात प्रत्यक्ष पीडितेशी संबंध निर्माण करणार्या, तिला मानसिक त्रास देणार्या, धर्मांतरण करुन निकाहाचे नाटक रचणार्या आणि तिच्यावर अत्याचार करणार्या शादाब रशीद तांबोळीसह त्याला पदोपदी साथ देणारा कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अझीम पठाण अद्यापही फरार आहेत. मध्यंतरी पसार आरोपी नेपाळमध्ये पळून गेल्याची आवई देखील उठवण्यात आली होती.

मात्र गेली दोन वर्ष पोलिसांना चकवा देत कायद्यापासून दूर असलेला शादाब तांबोळी अलिकडे सोशल माध्यमात चांगलाच सक्रिय असल्याचेही समोर आले आहे. असे असतानाही घारगाव पोलिसांना त्याचा शोध का लागत नाही? अशी सामान्यांच्या मनात शंकाही निर्माण झाली आहे. वास्तवात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, त्यावर खंडपीठाने त्याला सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन दिला, मात्र त्याची मुदत संपून आता नऊ महिने झाले आहेत. मात्र त्या उपरांतही त्याच्या प्रकरणाची सुनावणी होत नसल्याने आणि न्यायालयीन आदेशातही कोणतीही स्पष्टता नसल्याने कायदेशीर सापटीचा आधार घेत आरोपी शादाब दोन वर्षांपासून लागलेली इंटरनेटची भूक भागवत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. गुरुवारी (ता.1) या प्रकरणाची सुनावणी प्रस्तावित आहे.

संपूर्ण राज्याला हादरवणार्या या प्रकरणात एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल आहे. मात्र प्रत्यक्षात दोन वर्ष उलटूनही यातील निम्मे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरु असतानाच आता दोन वर्षांपासून पोलिसांच्या मुखी फरार असलेला प्रकरणातील मोहरा शादाब तांबोळी राजरोसपणे सोशल माध्यमात झळकू लागल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हा प्रकार न्यायालयीन अस्पष्टतेतून निर्माण झाल्याने पोलीस हतबल असल्याचे सांगत असून आरोपीचा अर्ज फेटाळावा असे पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे.

