सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा राज्यात लौकिक ः थोरात राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धूमधडाक्यात स्पर्धेचा शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्रीडा क्षेत्रामध्ये युवकांना करिअरच्या अनेक संधी आहेत. अनेक राज्य पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती, दर्जेदार आयोजन आणि उत्कृष्ट मैदान हे वैशिष्ट्ये असलेली संगमनेरची सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धा ही राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर शहरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २४ व्या वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक गिरीश मालपाणी, कैलास सोमाणी, रामहरी कातोरे, गगन थोरात, राणीप्रसाद मुंदडा, राजेंद्र काजळे, बँकेचे व्यवस्थापक वनम, सुधाकर जोशी, सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, डॉ. मैथिली तांबे, निखील पापडेजा, असिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे, अंबादास आडेप, गौरव डोंगरे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. याचबरोबर यश-अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होते. मैदानी खेळ हे आरोग्याची गुरुकिल्ली असून प्रत्येक युवकाने एक छंद जोपासण्याबरोबर एक मैदानी खेळ खेळलाच पाहिजे. खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी असून संगमनेरचा अजिंक्य रहाणे आज देशपातळीवर नेतृत्व करत आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक युवक व युवतीने विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर संगमनेरचे नाव उंचावले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगले मैदान करून ही स्पर्धा राष्ट्रीय ठरावी असे आयोजन येथे होत असल्याने राज्याबाहेरचेही अनेक खेळाडू संगमनेरमध्ये खेळण्यासाठी येतात हे आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक संदीप लोहे यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उत्कृष्ट नियोजनाने सजले क्रीडा संकुल..
संगमनेरची टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ही उत्कृष्ट आयोजनाने लौकिकास्पद ठरणार आहे. यामध्ये संपूर्ण मैदानावर हिरवळ, व्हीआयपी बैठक व्यवस्था, दहा हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी, संगीत, आकर्षक सजावट, ऑनलाइन प्रक्षेपण, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था या सुसज्ज तयारीमुळे ही स्पर्धा आकर्षक ठरणार आहे. या स्पर्धेत अजिंक्य रहाणेसह विविध राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *