एटीएम मशिन पळवणारी टोळी ४८ तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटीच्या इमारतीमधील इंडिया वन कंपनीचे एटीएम मशिन बोलेरो जीपला दोराने बांधून लंपास केल्याची व त्यातील हजारो रुपये लांबवल्याची घटना शनिवारी (ता.२३) रात्री घडली होती. या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांत उलगडा केला असून, पाच जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख ४२ हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, मोबाइल व तुटलेले एटीएम असा एकूण ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत गुन्हे शाखेकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की अज्ञात चोरट्यांनी समशेरपूर फाटा येथील एटीएम मशिनला दोरखंड बांधून बोलेरो गाडीने बाहेर ओढून काढले व घेऊन फरार झाले. त्यानंतर नितीन सखाराम पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोहेकॉ. बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी आदिंचे पथक तयार करून तपास सुरु केला. या पथकाने समशेरपूर परिसरामध्ये जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले.
तपास सुरू असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना हे एटीएम मशिन भरत लक्ष्मण गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) याने त्याच्या साथीदारांसह पळवल्याचे समजले. त्यावरुन पथकाने त्याच्यासह सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे (दोघेही रा. तिरडे), सुयोग अशोक दवंगे (रा. हिवरगाव पठार, संगमनेर), अजिंक्य लहानू सोनवणे (रा. चिंचोली गुरव, संगमनेर) यांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी फरार साथीदार गणेश लहू गोडे (रा. तिरडे) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४२ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, मोबाइल व तुटलेले एटीएम असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी भरत लक्ष्मण गोडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास अकोले पोलीस करत आहेत.