नोटा भरलेले ‘एटीएम’ मशिन उखडून पळवणारी टोळी पकडली! स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; अकोल्याच्या टोळीत संगमनेरचेही चोरटे..


नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्याकाही वर्षांपासून संगमनेर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधील वेगवेगळ्या बँकांचे ‘एटीएम’ फोडून त्यातील रकमा लांबविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आजवरच्या अशा घटनांमध्ये जिलेटीनचा अथवा गॅस कटरचा वापर करुन चोरट्यांनी एटीएम लुटल्याची पद्धतही त्यातून दिसून आली. मात्र शनिवारी समशेरपूर फाट्यावरील इंडिया-वन पेमेंट कंपनीचे एटीएम लांबवण्यासाठी चोरट्यांनी फारसा घाम न गाळता चक्क मशिनलाच दोरखंड बांधून सोबत आणलेल्या वाहनाच्या सहाय्याने ते डायरेक्ट उखडून नेण्याची नवी पद्धत अवलंबली होती. हा प्रकार नवाच असल्याने त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस अधिक्षकांच्या आदेशावरुन समांतर तपास करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांतच चोरट्यांचा माग काढला. या दमदार कारवाईत ‘एलसीबी’च्या पथकाने भरत गोडे या सराईत चोरट्यासह सहाजणांची टोळी उघड केली असून त्यातील पाचजणांना अटक केली आहे. चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांच्या रोकडसह साडेसात लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.


सदरची घटना गेल्या शनिवारी (ता.23) मध्यरात्रीनंतर समशेरपूर फाट्यावर असलेल्या आदिवासी सहकारी सोसायटीच्या व्यापारी संकुलात घडली होती. या इमारतीच्या दर्शनीभागातील एका व्यावसायिक गाळ्यात इंडिया-वन पेमेंट प्रा.लि. या कंपनीचे एटीएम मशिन आहे. एटीएमच्या सुरक्षेसाठी कंपनीने सुरक्षारक्षकाची व्यवस्था केलेली नाही, मात्र आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला असल्याने सदरची घटना त्यात कैद झाली होती. अज्ञात चौघांनी एटीएमचा दरवाजा उघडून आतील मशिनला दोराच्या सहाय्याने बांधले व बाहेरील बाजूस सोबत आणलेल्या पिकअपच्या मदतीने चक्क अख्खे मशिनच उखडून काढले आणि ते घेवून पोबारा केला.


याबाबत कंपनीचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सहाय्यक निरीक्षक भूषण हंडोरे यांच्याकडे सोपविला. मात्र या घटनेत चोरट्यांनी चोरीची वेगळीच पद्धत वापरल्याने त्याचे लोण अन्यत्र पसण्याची शक्यता लक्षात घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेलाही समांतर तपास करुन या घटनेचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली हवालदार बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, पंकज व्यवहारे, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, फुरकान शेख, संतोष खैरे, विशाल गवांदे, पोलीस शिपाई अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचा समावेश असलेल्या पथकाची नेमणूक करुन त्यांना तपासकामी रवाना केले.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेजचा कसून तपास तपास करीत चोरीत वापरलेल्या वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली असता सदरचे वाहन केळी-रुम्हणवाडी रस्त्याने पसार झाल्याची माहिती समोर आली. याच दम्यान सदरील चोरीच्या घटनेत तिरडे येथील भरत गोडे याचा हात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली. त्यानुसार त्यांनी तपास पथकाला त्याची खातरजमा करुन कारवाईचे आदेश दिले.


गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता तो आपल्या गावीच असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिरडे गावात जावून आरोपीच्या घराच्या आसपासची पाहणी करता तेथे पाचजण आढळून आले. यावेळी पोलिसांनी अधिक सावधपणे चारही बाजूने वेढा घालीत त्या सर्वांच्या एकाचवेळी मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांची ओळख पटविली असता त्यांनी आपली नावे भरजत लक्ष्मण गोडे (वय 24), सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे (वय 23), अशोक रघुनाथ गोडे (वय 25, तिघेही रा.तिरडे, ता.अकोले), सुयोग अशोक दवंगे (वय 20, रा.हिवरगाव पठार, ता.संगमनेर) व अजिंक्य लहानु सोनवणे (वय 21, रा.चिंचोली गुरव, ता.संगमनेर) असल्याचे सांगितले.


त्या सर्वांना ताब्यात घेवून मुद्देमाल आणि अन्य साथीदारांबाबतच्या चौकशीत या टोळीत गणेश लहु गोडे (रा.तिरडे) याचाही समावेश असल्याचे समोर आले, मात्र तो पसार झाला. समशेरपूर फाट्यावरुन उखडून नेलेले मशिन आरोपींनी एकदरी गावच्या शिवारातील म्हसवड घाटात लपवून ठेवलेल्या पिकअप वाहनात ठेवले होते. घटनेनंतर गॅसकटरच्या सहाय्याने त्यांनी ते फोडून त्यातील 50 हजार रुपयांची आपापसात वाटणी केली. यावेळी त्यांच्या अंगझडतीत 1 लाख 42 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, मोबाईल, तुटलेल्या एटीएमचे भाग असा एकूण 7 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणात अटक केलेला भरत गोडे हा सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दित चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

गेल्या काही वर्षांपासून उत्तर नगरजिल्ह्यात व विशेष करुन संगमनेर तालुक्यात एटीएम फोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र यातील बहुतेक घटनांचा आजवर तपास लागलेला नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी नाशिक रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून 60 लाखांची रक्कम लांबविली गेली होती, त्यावेळी त्या प्रकरणात हरयाणा-राजस्थान सीमेवरील टोळीचा हात असल्याचे तपासातून समोर आले होते. मात्र तेथून आरोपी आणणे अतिशय जिकरीचे असल्याने त्या प्रकरणाचा तपास अर्ध्यावरच संपला. मात्र यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत गुन्ह्याची उकल करुन मुद्देमालासह आरोपी जेरबंद केल्याने या दमदार कारवाईबद्दल जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Visits: 227 Today: 3 Total: 1105749

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *