… अखेर अकरा महिन्यांनी ट्रॅक्टर चोरीचा लागला छडा! कोपरगाव शहर पोलिसांनी कर्जतमधून जुगाडासहीत ट्रॅक्टर केला हस्तगत

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील संजीवनी कारखान्यात ऊस खाली केल्यानंतर ट्रॅक्टर व जुगाड शिंगणापूर गावाच्या पुढे एका झाडाखाली उभे केले. या ट्रॅक्टरचा चालक जेवण करायला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर व जुगाड चोरुन नेला. अखेर अकरा महिन्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी कर्जत तालुक्यातील आरोपीकडून ट्रॅक्टर व जुगाड ताब्यात घेऊन अटक केली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आनंदा संतोष माळी (वय ४९, रा. सायगाव बगळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी जानेवारी महिन्यात संजीवनी कारखान्यात ट्रॅक्टर जुगाडातून ऊस खाली केल्यानंतर शिंगणापूर गावच्या पुढे एका झाडाखाली उभे केले. त्यानंतर जेवण करण्यास चालक माळी गेले असता अज्ञात चोरट्याने याच संधीचा फायदा उठवून ट्रॅक्टर जुगाडासहीत चोरुन नेला. याप्रकरणी चालक माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुरनं. ५१/२०२३ भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, त्यांना कर्जत तालुक्यातील एका इसमाकडे हा ट्रॅक्टर व जुगाड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या असता पथकाने कर्जत पोलिसांच्या मदतीने सीताराम उर्फ कैलास नाना भोजे (रा. जामदारवाडी, ता. कर्जत) याच्याकडून तीन लाख रुपयांचा ट्रॅक्टर व जुगाड हस्तगत करुन अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते, पोहेकॉ. आर. पी. गुंड, जालिंदर तमनर, पोकॉ. गणेश काकडे, श्रीकांत कुर्हाडे, बाळासाहेब धोंगडे यांनी केली. अधिक तपास पोहेकॉ. आर. पी. पुंड हे करत आहे.
