बालविवाह झालेल्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती तालुक्यात बालविवाह जोमात; बलात्कार, पोक्सोसह विविध कलमान्वये पाच जणांवर गुन्हा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीरामपूरातील अवघ्या सोळावर्षीय मुलीचे कनोलीतील (ता.संगमनेर) एकोणतीस वर्षीय तरुणाशी लग्न लावून देण्याचा प्रकार उघड होवून जेमतेम काही तास उलटत नाहीत तोच तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मूळच्या जोर्वे येथील एका अल्पवयीन मुलीचा गेल्या वर्षी बालविवाह झाल्यानंतर आता अवघ्या सतराव्या वर्षी तिची प्रसूती झाल्याचे समोर आले आहे. प्रसूतीनंतर पोटदुखीची तक्रार घेवून ग्रामीण रुग्णालयात आलेल्या या मुलीच्या वयाबाबत वैद्यकीय अधिकार्यांना संशय आल्याने बालविवाहाचा हा प्रकार उघड झाला असून मुलीच्या जवाबावरुन तालुका पोलिसांनी तिचा 23 वर्षीय नवरा, आई-वडील व सासू-सासर्यावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीन्वये गुन्हा दाखल केला आहे. एकाच दिवशी दोन प्रकार समोर आल्याने तालुक्यात बालविवाह जोमात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळच्या जोर्वे येथील एका अल्पवयीन मुलीचा गेल्यावर्षी 25 जानेवारी रोजी तालुक्याच्या उत्तरेकडील एका गावातील 22 वर्षीय तरुणाशी विवाह लावून देण्यात आला होता. लग्नाच्यावेळी अवघ्या 16 वर्ष वय असलेल्या या मुलीला दिवसही गेले व गेल्या आठवड्यात तिची प्रसूतीही झाली. मात्र त्यानंतर पोटात दुखत असल्याची ती वारंवार तक्रार करु लागल्याने आजच्या स्थितीत 23 वर्षीय तिच्या नवर्याने तिला घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या तेथील वैद्यकीय अधिकार्यांना सदरील मुलीची शरीरयष्टी पाहून संशय आल्याने त्यांनी तिच्या नवर्याकडून मुलीच्या आधारकार्डची मागणी केली. त्यावरुन सदरील मुलीचे वय 17 वर्ष असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत तालुका पोलिसांना लेखी माहिती दिली.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्यासह महिला पोलिसांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सदर मुलीवर उपचार सुरू होते. महिला पोलीस कर्मचार्यांनी तिच्याशी संवाद साधून तिला विश्वासात घेतले व तिच्याकडून आवश्यक असलेली माहिती मिळवली. सदरील मुलीने दिलेल्या जवाबावरुन तिचे लग्न अवघ्या सोळाव्या वर्षी तर प्रसूती सतराव्या वर्षी झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आधारकार्डसह जन्मदाखल्याचीही पडताळणी केली असता ती अवघ्या सतरा वर्षाची असल्याचे सिद्ध झाल्याने तिने पोलिसांकडे नोंदविलेल्या जवाबाचे रुपांतर फिर्यादीत करण्यात आले.
त्यानुसार आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे व कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय 18 असल्याचे माहिती असूनही तिचे लग्न लावून देणारे पीडितेचे जन्मदाते आई-वडील, मुलाचे आई-वडील व सदरील मुलगी अल्पवयीन व आपल्यापेक्षा खूप लहान असल्याचे माहिती असूनही तिच्याशी लग्न करणारा व लग्नानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा तिचा 23 वर्षीय पती अशा पाच जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (एन), 109 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 6 (1), 4 व बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम 9, 10 व 11 प्रमाणे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्याकडे देण्यात आला आहे.
याच कडीत गेल्या मंगळवारी (ता.2) तालुक्यातील कनोली येथे राहणार्या प्रवीण पोपट वर्पे या 29 वर्षीय तरुणाचा त्याच्यापेक्षा वयाने निम्म्या असलेल्या श्रीरामपूर शहरातील एका अवघ्या 15 वर्ष साडेआठ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचा घाट सुरु होता. त्यासाठी नवर्या मुलाच्या घरासमोर मांडव घालून पाहुण्यांची मांदियाळीही सुरु झाली होती. मात्र स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीने सदरचा विवाह उधळून लावला. त्यानंतर गुरुवारी (ता.4) कनोलीचे ग्रामसेवक रवींद्र शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात हजर होवून याबाबत तक्रार दाखल केली.
त्यावरुन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कनोली येथील नवरा मुलगा प्रवीण पोपट वर्पे (वय 29) याच्यासह त्याचे वडील पोपट वर्पे, आई रंजना वर्पे व सदरील अल्पवयीन मुलीची जन्मदाती आई अशा एकूण पाचजणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एकाच दिवशी तालुक्यातून समोर आलेल्या या दोन्ही घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कायद्याने विवाहाच्यावेळी मुलीचे वय 18 तर मुलाचे 21 वर्ष असणे बंधनकारक आहे. मात्र आजही संगमनेर तालुक्यात कायद्याकडे दुर्लक्ष करुन अल्पवयीन मुलींचे त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या तरुणांशी लग्न लावून दिले जात असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. अशा विवाहांमागे काही सामाजिक कारणं असली तरीही कायदा मोडण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळेच गुरुवारी समोर आलेल्या दोन्ही प्रकरणांत पीडित मुलींच्या जन्मदात्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरुन तालुक्यात बालविवाहाबाबत जनजागृतीची गरज असल्याचेही ठळकपणे समोर आले आहे.