कारचालकाला मारहाण करुन चोरी करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ५ लाख ६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नायक वृत्तसेवा, नगर
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचालकाने प्रवाशांना रात्रीच्या वेळी सोडण्यासाठी मदत म्हणून गाडीत बसवले. मात्र, त्यातील एका प्रवाशाने चालकास टणक वस्तूने मारुन त्यांची कार, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणाचा सुपा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता, गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव ते सिन्नर रस्त्यावर दोघांना कारसह पकडले.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सचिन बापू पठारे (वय ३५, रा. पिंपळगाव कौडा, ता. जि. अहमदनगर) हे त्यांच्याकडील कारमधून (क्रमांक एमएच.१२, व्हीव्ही.७३३६) सुपा येथे त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापक यांना सोडून घरी जात असताना रस्त्याने जाणार्या दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडण्याबाबत विनंती केली. त्यावर रात्रीचा वेळ असल्याने प्रवाशांना गाडीमधे बसवून घेवुन जात असताना मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने पठारे यांच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तूने मारुन जखमी केले. त्यानंतर त्यांची कार, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४ रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. याप्रकरणी सुपा पोलिसांत गुरनं. ५४७/२०२३ भादंवि कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ. अतुल लोटके, पोना. रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, पोकॉ. रणजीत जाधव, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, प्रशांत राठोड यांनी पठारे यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सीसीटीव्ही फूटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कोपरगाव परिसरामध्ये कारचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरची कार व दोन आरोपी कोपरगाव ते सिन्नर रस्त्यालगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पथकास तत्काळ कारवाईबाबत सूचना दिल्या.

पथकाने सापळा रचून कारमधील शिवम मातादीन गौतम (वय २०, रा. बिनपूर, ता. पाटीयाली, जि. करजगंज, उत्तर प्रदेश, हल्ली रा. मिंडा कंपनीजवळ सुपा, ता. पारनेर), व दुर्जन अनारसिंग गौतम (वय २३, रा. नगलारगी, ता. पाटीयाली, जि. करजगंज, उत्तर प्रदेश, हल्ली रा. मिंडा कंपनीजवळ सुपा, ता. पारनेर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील कार, मोबाइल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकूण ५ लाख ६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांना पुढील तपासकामी सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
