सरकारी रुग्णालयांत आशांसाठी स्वतंत्र विश्राम कक्ष करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
सरकारी रुग्णालयांमध्ये आशा कर्मचार्‍यांच्या योगदानामुळे सामान्यांना उपचार मिळण्यात मोठी मदत होत आहे. रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढत आहे. माता व बाल मृत्यू कमी करण्यात यामुळे मदत झाली आहे. मात्र हे योगदान देत असताना आशा व गट प्रवर्तकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची कामाच्या ठिकाणी मोठी कुचंबना होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये आशा कर्मचारी व आशा गट प्रवर्तकांसाठी विश्राम कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी सिटू संलग्न जनशक्ती आशा व गटप्रवर्तक संघटनेने केली आहे.

दरम्यान, प्रसूतीच्या वेळी गरोदर मातेसोबत रात्री-अपरात्री रुग्णालयात आल्यावर येथे आशांसाठी मुक्कामाची कोणतीही सोय नसल्याने आशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. गरोदर माता किंवा रुग्णासोबत अनेकदा दोन-दोन दिवस रहावे लागल्याने मोठ्या कुचंबनेचा सामना आशांना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये आशा कर्मचारी व आशा गट प्रवर्तकांसाठी विश्राम कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी सिटू संलग्न जनशक्ती आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, भारती गायकवाड, संगीता साळवे, लक्ष्मी भांगरे आदिंनी केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली संपर्क करून याबाबतची मागणी करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरही प्रशासनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी सीटूने पुढाकार घेतला आहे.

Visits: 144 Today: 1 Total: 1970184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *