बहुसंख्य विद्यार्थ्यांना घेवून जाणारी प्रवासी बस उलटली! वीस विद्यार्थ्यांसह तिघे जखमी; तर मोठा अनर्थ घडला असता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहुरी तालुक्यातील कोळवाडी येथून संगमनेरकडे निघालेली महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणेनजीक उलटल्याची घटना आज सकाळी समोर आली. या अपघातात बसमधून प्रवास करणार्या वीस विद्यार्थ्यांसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या बसमधून एकूण ४८ प्रवासी प्रवास करीत होते. बसचा अॅक्सेल रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. ज्याठिकाणी हा अपघात घडला त्याच्या अगदी काही फूटावर विद्युत पुरवठा करणारे रोहित्र होते, सुदैवाने सदरील बसचा अपघात त्यापुढे काही अंतरावर घडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य करीत बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तालुका पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला होता. याबाबत अद्याप पोलीस दप्तरी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार पूर्वी संगमनेर तालुक्यातील म्हैसगाव येथे मुक्कामी थांबणार्या बसमधून डिझेल चोरीचे प्रकार समोर आल्याने सध्या सदरची बस दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या राहुरी तालुक्यातील कोळवाडी येथे मुक्कामी थांबते. या बससोबतच संगमनेर आगाराच्या अन्य एका बससह श्रीरामपूर व कल्याण आगाराची प्रत्येकी एक बसही याच ठिकाणी मुक्कामी असते. नेहमीप्रमाणे सोमवारी (ता.२५) सायंकाळी पावणेसात वाजता संगमनेर बसस्थानकातून निघालेली ही बस (क्र.एम.एच.०७/सी.९१४६) कोळवाडी (ता.राहुरी) येथे मुक्कामी पोहोचली होती. आज (ता.२६) सकाळी सहा वाजता तेथून संगमनेरच्या दिशेने निघून पिंपरणेनजीक पोहोचली. यावेळी बसमध्ये ४८ प्रवाशांसह एकूण ५० जण होते.
पिंपरण्यात येताच बसचा सेंट्रल रॉड तुटल्याने ती अनियंत्रित झाली. अशाप्रकारच्या घटनेत रॉड तुटल्यानंतर वाहनाचे स्टेरिंग फ्री होते, त्यामुळे वाहन अनियंत्रित होवून अपघाताची अधिक शक्यता असते. या बसबाबतही तसेच घडले आणि अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने हा प्रकार घडला त्याच ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे. त्यावरुन विद्युत पुरवठाही सुरु होता. सदरील बस अवघ्या काही फूट अलीकडे उलटली असती तर कदाचित मोठा अनर्थ घडण्याचीही दाट शक्यता होती. मात्र बसमधील प्रवाशांचे दैव बलवत्तर होते, त्यामुळे हा अनर्थ टळला.
बस उलटल्याने झालेल्या आवाजामुळे आसपास राहणार्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना बाहेर काढले. बहुसंख्य विद्यार्थी प्रवास करीत असलेल्या या बसच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तर काही विद्यार्थिनींच्या हाताला गंभीर मार लागल्याने त्या जायबंदी झाल्या आहेत. जखमींना तातडीने संगमनेरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापती नसल्या तरीही काही विद्यार्थिनींच्या हाताला मुका मार लागलेला असल्याने त्यांना आज होत असलेल्या जिल्हा परिषद व व्यवस्थापन शास्त्राच्या परीक्षेला मूकण्याची वेळ आली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, हवालदार संपत जायभाय व ओंकार शेंगाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या अपघातात विकास ढमाजी लांबहाते, तुकाराम बाबासाहेब दातीर, पितांबर उत्तम भुसारी (तिघेही रा. खरशिंदे), रेश्मा सुखदेव भुतांबरे, अर्चना बाळासाहेब दातीर, अझम ज्ञानदेव दातीर, पूजा दातीर, तृप्ती दिलीप दातीर, साक्षी रामराव कापडी (सर्व रा. खांबे), अनुराधा रमेश गायकवाड (रा. पानोडी), मयुरी शरद मुन्तोडे (रा. शिबलापूर), राहुल श्रावण जगताप, जयेश शिवाजी वर्पे (दोघेही रा. कनोली), कल्याण केशव घुगे, जिज्ञासा बाळू कांगणे, अस्मिता सुनील कांगणे, तनिष्का सागर कांगणे (सर्व रा. हंगेवाडी), सतीष लक्ष्मण सानप (रा. खळी), श्रृतिका अमोल खरात (रा. मालुंजे) व सानिका नागरे (रा. ओझर बु.) या २० विद्यार्थ्यांसह बाजीराव गोविंद लहांगे (वय ८२, रा. पिंपळगाव माथा), बसचे वाहक सोमनाथ सोपान बर्डे (रा. ओझर बु.) व चालक मनोहर गागरे (रा. वरवंडी) असे एकूण २३ जण जखमी झाले आहेत. उर्वरीत २७ जणांना किरकोळ मुका मार लागल्याने त्यांना अपघातस्थळावरुनच घरी पाठवण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्या खांबे येथील तृप्ती दिलीप दातीर या विद्यार्थिनीला आज अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचा पेपर द्यायचा होता, त्यासाठी ती संगमनेरात येवून नगरकडे जाणार होती. तर, ओझर बु. येथील सानिका नागरे या विद्यार्थिनीचाही आज व्यवस्थापन शास्त्राचा पेपर आहे, मात्र तिच्या हाताला दुखापत झाल्याने आजच्या पेपरला तिला मुकावे लागणार आहे. मात्र उजवा हात जायबंदी होवूनही तृप्ती दातीर या विद्यार्थिनीने नगर येथे जावून आज दुपारी ३ वाजता होणारी परीक्षा देण्याचा मनोदय बोलून दाखवला.