पुणतांबा येथील अन्नदात्यांचे आंदोलन अखेर दोन दिवसांसाठी स्थगित! कृषीमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई फळाला; मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक..


नायक वृत्तसेवा, शिर्डी
गेल्या चार दिवसांपासून पुणतांबा येथे सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन अखेर आज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज आंदोलनस्थळी जावून शेतकर्‍यांशी चर्चा केली. जवळपास तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेतून शेतकर्‍यांच्या पंधरा मागण्यांवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या मंगळवारी (ता.7) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात होणार्‍या बैठकीत त्यांवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याने तो पर्यंत पुणतांबे येथे सुरु असलेले किसान क्रांती आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या बाजूचे असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मंत्री महोदयांनी दिली.


किसान क्रांतीच्या माध्यमातून पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 1 जूनपासून धरणे आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलकांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली, यावेळी त्यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र ठोस कृतीशिवाय आंदोलन मागे घेण्यास शेतकर्‍यांनी नकार दिल्यानंतर आज (ता.4) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे पुणतांबे येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांबाबत कोअर कमिटीबरोबर सुमारे तीन तासांहून अधिक वेळ चर्चा केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही दूरध्वनीवरुन संपर्क साधीत शेतकर्‍यांशी त्यांचा संवाद घडवून आणला.


चर्चेची प्रक्रीया सकारात्मक पार पडल्यानंतर आंदोलकांसमोर बोलतांना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत अतिशय संवेदनशील आहेत. त्यांनी दूरध्वनीवर पुणतांबा येथील शेतकर्‍यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत. शेतकर्‍यांच्या विविध पंधरा मागण्या आहेत. यातील काही मागण्या कृषी, सहकार व पणन, वित्त, उर्जा, दूग्धविकास, कृषीमूल्य आयोग या विभागांशी संबंधित आहेत. तर काही मागण्या केंद्र सरकाराशी संबंधित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी (ता.7) मंत्रालयात यासर्व विभागांचे मंत्री, सचिव, संबंधित अधिकारी व किसान क्रांतीच्या सदस्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील 32 लाख शेतकर्‍यांना 21 हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. याच योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील पात्र शेतकर्‍यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून 3 लाख रूपयांचे पीक कर्ज बिनव्याजी स्वरुपात देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यासाठी ड्रीपच्या माध्यमातून 80 टक्के अनुदान देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.


याप्रसंगी शेतकर्‍यांच्या 15 मागण्यांसोबत पीक विमा योजना, मागील आंदोलनाच्या वेळी शेतकर्‍यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतही चर्चा झाली. कृषीमंत्र्यांशी झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर किसान क्रांतीने दोन दिवसांसाठी आपले धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. याप्रसंगी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे, पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, मुरलीधर थोरात, निकिता जाधव यांच्यासह किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 20 Today: 1 Total: 116376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *