परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई द्या!

परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई द्या!
किसान सभेची राज्य सरकारकडे मागणी; केंद्रानेही मदत करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
परतीच्या पावसाने राज्यात शेतकर्‍यांच्या तयार पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. विशेषतः कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्ष पिकाचे तर कोकणात भाताचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील एकूण लागवडी पैकी 30 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी या संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत करत नुकसानीची रास्त भरपाई द्यावी. एकरी किमान 50 हजार रुपये भरपाई देऊन शेतकर्‍यांना तातडीने दिलासा द्यावा. केंद्र सरकारने सुद्धा शेतकर्‍यांवरील या संकटाच्या काळात तातडीने केंद्रीय पथक पाठवावे व शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी आपत्ती सहाय्यता निधीतून राज्य सरकारला पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.


राज्य सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात पंचनाम्यांची कार्यवाही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शेतातील साचलेले पाणी व वाहून गेलेली शेती यांच्या नुकसानीची रास्त नोंद व्हावी यासाठी पंचनाम्यांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. शिवाय पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदींनुसार पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळेल यासाठी सुद्धा सरकारी यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या कृषी विभागाने याबाबत अत्यंत सतर्कतेने कार्यवाही करावी अशी मागणी देखील किसान सभेने केली आहे.


पीक विमा योजनेंतर्गत भरपाई मिळावी यासाठी शेतकर्‍यांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी, मोबाईल सुविधा उपलब्ध नसल्यास कृषी विभाग, विमा कंपनीचे कार्यालय किंवा बँकेत अर्जाच्या विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रे जोडून भरपाईसाठी दावा करावा. तसेच शेतकर्‍यांना याबाबत मदत व्हावी यासाठी किसान सभेने राज्यभर सहाय्यता केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शेतकर्‍यांनी यासाठी किसान सभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असे आवाहन किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी केले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *