घारगाव पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास पकडले
घारगाव पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास पकडले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास दहा किलोमीटर अंतर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर त्याचा साथीदार फरार झाला असल्याची घटना शनिवारी (ता.17) संध्याकाळी घडली आहे. पोलिसांनी या चोराकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या गणपीरदरा येथील चाँदभाई रहेमान शेख हे शनिवारी दुपारी आपली दुचाकी (क्रमांक एमएच.17, यू.2365) हिच्यावरून घारगाव याठिकाणी पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेल अमृत सरोवर येथे चहा पिण्यास गेले होते. चहा पिऊन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली दुचाकी दिसत नाही म्हणून त्यांनी इकडे-तिकडे शोधाशोध केली असता दुचाकी कुठेच मिळून आली नाही. शेवटी आपली दुचाकी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शेख हे घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गेले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

काही वेळाने गुप्त खबर्यामार्फत पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना माहिती मिळाली की, पिंपळदरी गावाकडे दुचाकी गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे, प्रमोद चव्हाण, हरिशचंद्र बांडे यांनी पिंपळदरीकडे जात दहा किलोमीटरच्या अंतरावर नदीच्या कडेला चोरास दुचाकीसह पकडले. मात्र यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या चोराला खाक्या दाखवताच दीपक सुनील बेल्हेकर (रा.श्रीरामपूर) असे त्याने नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बेल्हेकर याच्याकडून दुसरी दुचाकी हस्तगत केली. दरम्यान चोरांनी दुचाकीचे स्पेअर पार्ट बदली करून दुसर्या दुचाकीला टाकले होते. त्यामुळे फरार झालेल्या दुसर्या दुचाकीचोराचा शोध घारगाव पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र खेडकर हे करत आहे.

