सावत्र मुलीसह मेव्हणीशी ‘संबंध’ ठरले खुनाचे कारण! लळई घाटातील खुनाला फुटली वाचा; जावयासह साडूने मिळून काढला ‘काटा’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शनिवारी पठारभागातील माळवाडीनजीकच्या लळई घाटात घडलेल्या खून प्रकरणाला अखेर वाचा फुटली असून घारगाव पोलिसांनी वेगवान चक्रे फिरवताना दोघा मुख्य आरोपींसह एका महिलेला अटक केली आहे. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत खबर्यांचे अक्षरशः जाळे निर्माण केले होते. त्यातून मिळालेल्या प्रत्येक माहितीचे बारकाईने विश्लेषण केल्यानंतर सामान्य माणसाला चक्रावणारा हा संपूर्ण प्रकार समोर आला. या घटनेत खून झालेल्या गोरख बर्डे याचे आपल्याच सावत्र मुलीसह मेव्हणीशी अनैतिक संबंध होते, त्यातूनच जावई आणि साडूने मिळून त्याचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी आज पहाटे अवघ्या चारच दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाचा गुंता सोडवताना आरोपींना गजाआड केले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी (ता.१६) साकूर रस्त्यावरील लळई घाटात एका अज्ञात इसमाचा अर्धवट जळालेला नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी रणखांब येथील साहेबराव बारवे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमांविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे व महादेव हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असताना पोलिसांनी खबर्यांचे जाळे निर्माण करुन मयताच्या पार्श्वभूमीसह त्याची खासगी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.

त्यातूनच एक-एक कडी उलगडत गेली आणि सुरुवातीला अतिशय गुंतागुंतीच्या वाटणार्या या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांतच पर्दाफार्श करण्यात पोलिसांना यश आले. या घटनेत खून झालेल्या गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. मीरपूर, लोहारे) याच्या दुसर्या बायकोला तिच्या पहिल्या पतीकडून झालेल्या सावत्र मुलीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचा पती दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) याला होता. त्यासोबत मयताने आपल्या वासनेची भूक शमविण्यासाठी गोतावळ्यातच धागे विणण्यास सुरुवात केल्याने त्याच्या गुताड्यात त्याची मेव्हणीही गुरफटली गेली होती. याच संबंधाने अखेर त्याचा घात केला.

गेल्या शनिवारी (ता.१६) चंदनापुरीतील एका लग्नसोहळ्यात मयत गोरख दशरथ बर्डे याच्यासह त्याचा जावई दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) व साडू विलास लक्ष्मण पवार (रा. मूळ माळवाडी (साकूर), हल्ली मु. आणे, ता. जुन्नर) एकत्र आले होते. लग्नानंतर मयत गोरख बर्डे घरी जातो असे सांगून तेथून निघून गेला, तर त्याचा जावई आणि साडू वरातीचे निमित्त करुन तेथेच थांबले. मात्र त्या दोघांच्याही मनात संशय असल्याने त्यांनी काही वेळाने माळवाडीत (साकूर) जावून वास्तव उघड करण्याचा चंग बांधला व त्याप्रमाणे गोरख बर्डे चंदनापुरीतून गेल्यानंतर तासाभराने माळवाडी गाठली.

चोर पावलांनी माळवाडीत पोहोचलेल्या दिनेश पवार व विलास पवार यांनी आपल्या घराकडे गेल्यानंतर आसपास शोध घेतला असता गोरख बर्डे हा त्याच्या मेव्हणीसोबत साडूच्याच शेतात आक्षेपार्ह स्थितीत दिसून आला. त्यामुळे त्या दोघांनीही त्याला तेथेच यथेच्छ बदडले. यावेळी त्याच्याशी प्रणय करणारी त्याची मेव्हणीही विरोधात जावून त्याच्या जीवावर उठली. त्याला मारहाण केल्यानंतर दोघांनीही त्याला दुचाकीवरुन वन विभागाच्या हद्दीतील निर्जन लळईच्या घाटात नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून केला, त्यानंतर त्याला निर्वस्त्र करुन त्याचे कपडे त्याच्याच छातीवर ठेवून पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्यात आले व ते दोघेही तेथून पसार झाले.

सदरील प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत याप्रकरणाची एक-एक कडी जोडण्यास सुरुवात केली. घारगाव पोलिसांनीही आपल्या खबर्यांचे नेटवर्क सक्रीय करुन मृतासह त्याच्या कुटुंबातील बारकावे हुडकण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच सुरुवातीला अतिशय गुंतागुंतीचे वाटणार्या या प्रकरणाचा तपास दृष्टीपथात आला. त्यानंतर आज पहाटे एकच्या सुमारास पोलिसांनी यातील मुख्य आरोपी व मयत गोरख बर्डे यांचा जावई दिनेश शिवाजी पवार व मयताचा साडू विलास लक्ष्मण पवार या दोघांना अटक केली तर, त्याची मेव्हणी विमल विलास पवार हिलाही आज सकाळी अटक करण्यात आली आहे. या सर्वांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यातून या प्रकरणाचे बारकावे समोर येण्याची शयता आहे. घारगाव पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा उलगडा केल्याने पठारभागातून समाधान व्यक्त होत आहे.

अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबात गुरफटलेल्या या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान घारगाव पोलिसांसमोर होते. मात्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे व महादेव हांडे यांनी अतिशय कसोशीने या प्रकरणाची प्रत्येक कडी जोडीत अखेर मयत गोरख बर्डे याचा खून केल्याप्रकरणी त्याचा जावई, साडू आणि मेव्हणीला अटक केली आहे. या घटनेने गेल्या अनेक महिन्यांपासून घारगाव पोलिसांच्या तपासाचा वनवासही संपला आहे.

