निळवंडेचा डावा कालवा फोडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच रोखल्यानंतर आंदोलकांचा जागेवरच ठिय्या
नायक वृत्तसेवा, अकोले
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनातमुळे कालव्यालगत असलेल्या शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तत्काळ आवर्तन बंद करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या (शरद पवार गट) तथा अगस्ति साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. जर पाणी बंद केले नाही तर मंगळवारी (ता.१९) कालवेग्रस्त शेतकर्यांना सोबत घेऊन कालवा फोडण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले असतानाही खानापूर येथे कालवा फोडण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी वेळीच आंदोलकांना रोखले. त्यानंतर त्यांनी तेथेच ठिय्या मांडला.
१८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणार्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन तत्काळ बंद करावे. कारण, निकृष्ट कामामुळे गळतीमुळे कालव्यालगत असलेल्या शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होत आहे. निळवंडे ते कळसपर्यंतच्या गावांतील शेतकर्यांच्या शेकडो एकर शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. त्यामुळे कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे या मागणीसाठी कालवेग्रस्त शेतकर्यांना सोबत घेऊन कालवा फोडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या (शरद पवार गट) तथा अगस्ति साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांनी दिला होता.
याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आलेले होते. मात्र, पाणी बंद न केल्याने आक्रमक झालेल्या सुनीता भांगरे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी शेतकर्यांना सोबत घेऊन खानापूर येथे कालवा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांच्यासह कर्मचार्यांनी वेळीचे आंदोलकांना रोखले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी तेथेच ठिय्या दिला. याठिकाणी जलसंपदा विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. त्यानंतर चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे शेतकर्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.