शेतकर्‍यांची फसवणूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन मैदानात

शेतकर्‍यांची फसवणूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन मैदानात
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील व्यापार्‍यांकडून तालुक्यातील शेतकर्‍यांची वारंवार होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन मैदानात उतरले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी तालुक्यातील कामगार पोलीस पाटलांना सूचना केल्या आहेत.

श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला शेतमाल परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील अनोळखी व्यापार्‍यांना विक्री करतात. त्यात विविध ठिकाणच्या व्यापार्‍यांकडून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेकांना शेतमालाचे पैसे म्हणून धनादेश देण्यात आले आहेत. परंतु, हे धनादेश बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर ते रद्द होतात, तसेच संबंधित व्यापार्‍याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक खोटे असल्याचे समोर येतात. त्यामुळे शेतकर्‍यांकडे संबंधित व्यापार्‍यांची कुठलीही माहिती किंवा ओळख नसल्याने स्थानिक पोलिसांना कारवाई करताना अडथळे येतात. परिणामी, शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी परराज्यांसह अन्य जिल्ह्यांतील व्यापार्‍यांना शेतमालाची विक्री करताना संबंधितांचे आधारकार्ड, पॅनकार्ड पडताळून व्यवहार करावेत, तसेच व्यवहाराचा एक धनादेश जपून ठेवावा. त्यामुळे संबंधित व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांना मदत होईल. परराज्यांतील व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. याबाबत शेतकर्‍यांनी अधिक सतर्कता राखण्याचे आवाहन वरीष्ठ पोलिस अधिकारी नोपाणी यांनी केले आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 1959033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *