साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी त्रिसदस्यीय समितीकडून मनमानी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीमध्ये पुन्हा एकदा साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. साई संस्थानचा कारभार पाहण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्रिसदस्यीय समिती हटवून संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे केली आहे.
२०१९ साली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच शिर्डीच्या साई संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिर्डीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी या नियुक्त्या साई संस्थानच्या घटनेनुसार नसल्याचा आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने साईबाबा संस्थानवर असलेले राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करत जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला कामकाज पाहण्याचा आदेश दिलेला आहे.
मात्र, त्रिसदस्यीय समिती घेत असलेल्या निर्णयांवरून अनेकदा शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान यांच्यात मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या समिती विरोधात शिर्डी ग्रामस्थांमध्ये रोष वाढला असून राज्य सरकारने ही समिती हटवून साईबाबा संस्थानवर तातडीने नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त शिवाजी गोंदकर म्हणाले, की सध्या संस्थानवर जी समिती आहे ती शिर्डीकरांसाठी सकारात्मक नसल्याचं आम्हांला वाटत आहे. साईबाबा संस्थान आणि शिडी ग्रामस्थांमध्ये संवाद राहावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करावा असे गोंदकर यांनी म्हटले आहे.