दोनवेळा दिली हुलकावणी मात्र तिसर्‍यांदा मृत्यूने गाठलेच! चंदनापुरीतील भीषण अपघात; टोलनाक्यावर ‘क्रेन’च नसल्याचा मुद्दा ऐरणीवर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी रात्री आठच्या सुमारास चंदनापुरी शिवारात घडलेल्या भीषण अपघाताने अकोल्यातील दोन कुटुंबांवर घाला घातला. या घटनेत प्रसिद्ध विसाळ भेळचे संचालक अभय सुरेश विसाळ यांच्यासह त्यांचे स्नेही सुनील दिनकर धारणकर, त्यांची पत्नी आशा व अवघ्या दोन वर्षांची नात ओजस्वी या चौघांचा बळी गेला. अपघातानंतर काही क्षणात तेथे पोहोचलेल्या चंदनापुरीतील ग्रामस्थांनी अवजड सामान भरलेल्या मालट्रकच्या खाली दबलेल्या कारमधील प्रत्येकाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र वेळीच त्यांना यांत्रिक सहाय्य मिळाले नाही. त्यामुळेच मृतांची संख्या वाढल्याची चर्चा आता चंदनापुरीतून समोर आली असून अपघातस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टोलनाक्यावर क्रेन उपलब्ध असता तर कदाचित आणखी काहीजणांचा जीव वाचवता आला असता असेही बोलले जात आहे. त्यामुळे या अपघाताने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासह केवळ टोलवसुली करण्यातच धन्यता मानणारी ठेकेदार कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अपघातात ठार झालेल्या दोन्ही कुटुंबातील मयतांना यापूर्वी नियतीने वेळोवेळी दगा दिल्याचेही या अपघातानंतर समोर आले आहे.

रविवारी (ता.१७) रात्री आठच्या सुमारास चंदनापुरीपासून एक किलोमीटर पुण्याच्या बाजूने सदरचा अपघात घडला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेला अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू ट्रक (क्र.यू.पी.२४/टी.८५५०) पुण्याहून लोखंडी अवजड सामान घेवून नाशिकच्या दिशेने निघाला होता. चंदनापुरीगाव दृष्टीपथात असतानाच सदर मालट्रकच्या चालकाने पुढे चाललेल्या टोयोटो कंपनीच्या इटीयोस कारला (क्र.एम.एच.१७/ए.जे.२६९६) भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच या भागातून जाणारा रस्ता काहीसा गोलाकार वळणातील असल्याने मालट्रकमध्ये भरलेल्या अवजड सामानाचा दाब एका बाजूला निर्माण होवून दोन्ही वाहने धावत असताना अचानक सदरील मालट्रक शेजारुन चाललेल्या इटीयोस कारवर कलंडला आणि सदरचा भीषण अपघात घडला.

या घटनेनंतर मालट्रकचा चालक आणि त्याचा साथीदार क्षणात तेथून पसार झाले. मात्र या अपघाताचा आवाज चंदनापुरीपर्यंत पोहोचल्याने अनेकांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरु केले. मात्र त्यात अडथळा आला तो क्रेनचा. अपघातग्रस्त कार मालट्रकखाली दबलेली असल्याने मालट्रक बाजूला केल्याशिवाय मदत कार्य करणे अशक्य होते. मात्र त्या उपरांतही काही तरुणांनी आपला जीव धोक्यात छोट्याशा सापटीतून आत शिरुन कोणाला बाहेर काढता येईल का याची चाचपणी केली. मात्र हा अपघात इतका भीषण होता की त्यात सदरील कार पूर्णतः दाबली गेल्याने त्यातील पाचही जण त्यात अडकले होते. काही वेळातच घटनास्थळावर क्रेनही आली, मात्र त्याची क्षमता कमी पडल्याने मोठ्या क्रेनसाठी काहीवेळ प्रतीक्षा करावी लागली आणि काळाने येथेच आपला डाव साधला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थ अपघातस्थळी पोहोचले त्यावेळी बचावलेल्या अस्मिता अभय विसाळ (वय ४०) यांच्यासह त्यांचे पती अभय हे दोघेही मदतीची याचना करीत होते. मात्र वेळेत यांत्रिक मदत उपलब्ध न झाल्याने प्रयत्न करुनही ग्रामस्थांना त्यांच्या हाकेला प्रतिसाद देणे शक्य झाले नाही. अखेर अपघातानंतर जवळपास १५ मिनिटांनी पोहोचलेल्या मोठ्या क्रेनने मालट्रक बाजूला काढण्यात आला आणि त्यानंतर काही क्षणातच अनेकांच्या मदतीने कारमधील एकाएका जखमीला बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे इतक्या भयानक अपघातातही अस्मिता विसाळ ही महिला बचावली. तर, अवघ्या दोन वर्षांच्या ओजस्वी हर्षद धारणकर या चिमुकलीला एकही वरखडा न उमटताही केवळ गुदमरुन तिचा बळी गेला. सर्व जखमींना तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने या भीषण अपघातात उपचारापूर्वीच चौघांचा बळी घेतला.

विसाळ व धारणकर हे एकमेकांचे नातेवाईक नव्हते, तर परमस्नेही म्हणून अकोल्यात त्यांना ओळखले जात. सुभाष चौकातील एकाच इमारतीत राहणार्‍या या दोन्ही कुटुंबांतील चौघांसह धारणकर यांची दोन वर्षांची नात रविवारी पुण्यातील एका मुंजीच्या सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत घराकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घावा घातला. अकोल्यातील विसाळ यांची भेळ खूप प्रसिद्ध आहे. आपले वडील व चुलत्यांची परंपरा खांद्यावर घेवून अभय विसाळ यांनी हा व्यवसाय आणखी पुढे नेला. तर त्यांचे दोन भाऊ प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. यापूर्वी २००६ साली ते आपल्या घराच्या छतावरुन पडले होते, तर २००९ साली अमरनाथ यात्रेहून परत येतांना अकोल्यातील प्रवरा नदीवरील पूलावर त्यांची जीप पलटी झाली होती. मात्र या दोन्ही वेळी त्यांची पुण्याई आडवी आल्याने काळाला माघारी फिरावे लागले होते. मात्र यावेळी अखेर त्याने त्यांना गाठलेच.

मयत सुनील दिनकर धारणकर यांना दोन मुले आहेत. त्यातील कुशल नावाच्या एका मुलाचा याच पुणे-नाशिक महामार्गावरील एका अपघातात यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर त्यांचा दुसरा मुलगा हर्षद एका विदेशी कंपनीत सेवेत असून सध्या ते घरातूनच काम करतात. अपघातग्रस्त वाहनात त्याची एकुलती एक मुलगी ओजस्वी आपल्या आजी-आजोबासह पुण्याला गेली होती. मात्र काळाने तिच्यावरही झडप घातल्याने या भीषण अपघातात तिचाही बळी गेला. या घटनेनंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला असून अशाप्रकारच्या अपघातानंतर तातडीने मदतकार्य करण्यासाठी सक्तीने टोलवसुली करणार्‍या टोलनाक्यावर यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चौघाही जणांवर आज सकाळी अकोले येथे अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अकोल्यातील सर्वच क्षेत्रातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती.

Visits: 6 Today: 1 Total: 23122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *