समाज माध्यमांमुळे आजच्या पिढीचे वाटोळे होत आहे : कानिटकर मुला-मुलींच्या संसारात पालकांचा वाढता हस्तक्षेप घटस्फोटांची संख्या वाढवणारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी जीवनात विवाहाचा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. विवाह बंधन हे पूर्णतः विश्वासावर अवलंबून असल्याने पती व पत्नीचे परस्परांशी असलेले संबंध घट्ट आणि विश्वासार्ह असावे लागतात. भारतीय संस्कृतीत कुटुंब संस्था ही संकल्पना आपल्या पायावर भक्कमपणे उभी आहे. मात्र सध्याच्या बदलत्या विचारप्रणीचा त्यावर मोठा परिणाम झाल्याने अनेक घटनांत ती डळमळीत झाल्याचेही दिसून येते. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याला मर्यादा होत्या, मात्र आत्ताच्या युगातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संघर्षातून जीवनाची वाटचाल करीत आहेत. अशावेळी विवाहानंतर पती-पत्नीने विश्वासाने सहजीवन स्वीकारण्याची गरज आहे, मात्र आजच्या मुला-मुलींना सहजीवन म्हणजे काय असते याचेच ज्ञान नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी आपला जीवनसाथी निवडतांना तो कसा असावा याचा सारासार विचार करुनच विवाहाचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अनुरुप विवाह संस्थेच्या संचालिका, समुपदेशक गौरी कानिटकर यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे सहाव्या दिवसाचे पुष्प गुंफतांना ‘असे जुळतात विवाह.. अडथळे आणि गंमतीजमती’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संगमनेर विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख अरुण ताजणे, जसपाल डंग, अनिल राठी व अॅड ज्योती मालपाणी आदी उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना कानिटकर म्हणाल्या की, सध्याच्या स्थितीतील विवाहाची प्रक्रिया पैशांभोवती फिरत आहे. आत्ताची पिढी केवळ पैशांचा विचार करणारी असल्यानेही मोठी समस्या निर्माण झाली असून पैशांच्या गर्तेतून बाहेर येण्याची गरज आहे. या अडचणींमध्ये आता सोशल माध्यमांचीही भर पडल्याने आजच्या पिढीचे अक्षरशः वाटोळे होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या सहजीवनाला लागलेल्या वाळवीप्रमाणे ही माध्यमं परिणाम करीत असल्याने त्याचा किती व कसा वापर करायचा हे ठरविण्याची वेळ आता येवून ठेपली आहे. पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धतीतून मुलांवर अन्य संस्कारांसह जीवन मूल्यांचेही संस्कार होत, मात्र देशात आता विभक्त कुटुंब पद्धतीची पाळेमुळे रुजत असल्याने शाळांमधूनच जीवनमूल्यांचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पूर्वीचे पालक अधिक खंबीरपणे आपले निर्णय घेवून आपल्या पाल्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत. तुलनेत आत्ताचे पालक मात्र खूप गुळगुळीत आहेत. त्यामुळे मुला-मुलींच्या दिशा भरकटत असून त्याला पालकच जबाबदार असल्याचे सांगतांना पाल्यांच्या प्रति पालकांनी खंबीर राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विवाहानंतर मुला-मुलींच्या जीवनात त्यांच्या पालकांचा वाढलेला हस्तक्षेपही मुलांचे संसार उध्वस्त करणारा ठरत असून गेल्या काही वर्षात घटस्फोटासारख्या गोष्टींचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता आली असून लग्नानंतर पालकांनी आपल्या मुलांना जगण्याचे स्वातंत्र्य देण्याची आणि त्यांचे निर्णय त्यांनाच घेण्याची मुभा देण्याची आवश्यकता कानिटकर यांनी बोलून दाखविली.

आजच्या काळात ‘मॅरेज’ ऐवजी ‘वेडिंग’चे फॅड आले आहे. लग्न म्हणजे नेमके काय? त्याचे जीवनातील फायदे व तोटे काय हे काणालाही समजेनासे झाले आहे. आजची पिढी तर या गोष्टींच्या विचारापासून खूप दूर चालली आहे. पूर्वी पत्नीला अर्धांगिनी अथवा सहचारिणी म्हणून समजले जात असतं, हा विचार आता कालबाह्य होवू लागला असून पत्नी म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेसाठी सोबत असलेली बाहुली बनून राहली असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. अॅड.ज्योती मालपाणी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
…
