कोविडमुळे अकलापूर येथील दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईची झळाळी; भाविकांची दर्शनासाठी रीघ
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या अकलापूर येथील स्वयंभू दत्त महाराजांचा जयंती सोहळा यावर्षी मंगळवारी (ता.29) कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट तर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
अकलापूर येथे भव्य दिव्य असे दत्त महाराजांचे स्वयंभू देवस्थान आहे. दरवर्षी दत्त जयंती निमित्ताने हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. पुणे, मुंबई, नगर, नाशिक आदी वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे पठार भागातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. दत्त जयंतीला यात्रौत्सव भरला जातो. यंदा मात्र कोविडमुळे दर्शन वगळता परिसरात शुकशुकाट होता.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन व देवस्थान समितीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामध्ये यंदाचा दत्त जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. यात्रौत्सवानिमित्त येणार्या छोट्या व्यावसायिकांना मनाई करण्यात आली होती. तसेच कोविडचे संपूर्ण नियम पाळून आणि सुरक्षितता पाळून भाविकांना दर्शन घेण्यास सूचित करण्यात आले होते. भाविकांनी देखील आवाहनला प्रतिसाद देत नियम पाळून मनोभावे दर्शन घेतले.