साळीवाडा खंडोबा मंदिरात होणार नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना चंपाषष्टी उत्सवानिमित्त शोभायात्रा; उद्यापासून तीन दिवस धार्मिक अनुष्ठान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारो संगमनेरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या साळीवाड्यातील श्री मल्हारी मार्तंड खंडोबाराय मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून येत्या गुरुवारी मंदिरात नव्याने घडविण्यात आलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गेल्या बुधवारपासून मंदिरात खंडोबारायांचा चंपाषष्टी षड्रात्रौत्सव सुरु असून आज देवाच्या लग्न सोहळ्याने या उत्सवाची सांगता होईल. त्यानंतर उद्यापासून त्रिदिनात्मक मल्हारी मार्तंड मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि ध्वजारोहणाचा सोहळा होणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर गुरुवारी दुपारी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

संगमनेरातील श्रीगोपाळ पडताणी यांच्या घराच्या पाठीमागील भागात असलेल्या आडातून मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याच ठिकाणी देवाचे छोटेखानी मंदिर उभारुन तेथे नियमितपणे पूजाअर्चा सुरु झाली. काही वर्षांपूर्वी श्री मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर पूर्वी अतिशय छोट्या असलेल्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले. मात्र मंदिरासाठी उपलब्ध असलेली जागा आटोपशीर असल्याने विश्वस्तांच्या विनंतीवरुन श्रीगोपाळ व राजाभाऊ पडताणी आणि अ‍ॅड. राजेश व डॉ. योगेश भुतडा यांनी औदार्य दाखवताना आपल्या मालकीच्या जागेतील काहीभाग मंदिरासाठी दिल्याने आजच्या स्थितीत त्या जागेवर मोठे मंदिर उभे राहीले आहे.

अतिशय आकर्षक आणि भव्य स्वरुपात बांधण्यात आलेल्या या मंदिरात आता खास राजस्थानहून तयार करुन आणण्यात आलेल्या खंडोबारायांच्या मुख्य मूर्तीसह म्हाळसादेवी व बाणूबाई यांच्या गाभार्‍यातील मूर्ती तसेच, बाह्यबाजूस श्रीगणेश व मारुतीरायाच्या मूर्ती बसविण्यात येणार आहेत. त्यासोबतच मंदिराच्या कलशारोहणासह ध्वजारोहणाचाही सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून (ता.१३) खंडोबारायाचा षड्रात्रौत्सव सोहळा सुरु असून आज दुपारी देवाच्या लग्न सोहळ्याने त्याची सांगता झाली. त्यानंतर उद्यापासून (ता.१९) पुढील तीन दिवस त्रिदिनात्मक प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार व बुधवार दोन दिवस दुपारी १२ ते ६ यावेळेत मंदिराच्या प्रांगणात धार्मिक यज्ञविधी व अनुष्ठान होणार असून गुरुवारी सकाळी ११.३५ वाजता नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला संगमनेरकर खंडोबाभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्ट (साळीवाडा) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 189 Today: 2 Total: 1110149

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *