अभूतपूर्व! जिल्ह्याचे पालक थेट शेतकर्यांच्या बांधावर..! जिल्हाधिकार्यांनी पुसली पठार भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची आसवे

राजू नरवडे, घारगाव
एरव्ही नुकसान झालेल्या ठिकाणी जावून परिस्थितीची पाहणी करणं, आवश्यक आदेश वा सूचना देणं आणि नुकसानग्रस्तांचे सांत्त्वन करण्याची अलिखित जबाबदारी राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंची असते. मात्र नव्याने जिल्ह्याच्या पालकत्त्वाचा पदभार सांभाळणार्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या अलिखित नियमांची जंत्री कालबाह्य ठरवित पदभार स्वीकारताच रविवारी (ता.25) थेट संगमनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त पठारभागाचा दौरा केला. ‘भयंकर नुकसान झाले आहे, शेतकर्यांच्या व्यथा शेतकर्यालाच समजतात. मी देखील शेतकरी आहे, शासनाची मदत तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचावी यासाठीच मी आलो आहे.!’ असे सांगत त्यांनी भुईसपाट पिकांसमोर आसवं गाळणार्या बळीजाला धीर दिला. तालुक्याच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच बांधावर जिल्हाधिकार्यांचे ‘ममत्व’ अनुभवणारे शेतकरी या प्रसंगाने भारावले होते.

गेल्या आठवड्यात तालुक्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले. या पावसाने दुष्काळाला पूजलेल्या पठारभागातील अवस्था तर अत्यंत दयनीय झाली. या भागात शेंदरी (लाल) कांदा हे मुख्य पीक घेतले जाते, त्यावरच या भागातील बळीराजाचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते. पावसाळ्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमाने बहरली होती. चार-आठ दिवसांत पीक काढून पैसा हाती येईल आणि यंदाचा दिवाळ सण दणक्यात साजरा करु या विचाराने पठारावरील वाड्या-वस्त्यांवर आनंदाचा झरा वाहत असतांना परतीच्या पावसाने दगा दिला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला नेला.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती असल्याने राज्य सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देत शेतकर्यांना मदतीचे आश्वासनही दिले आहेे. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्याचे कामकाज सुरु होते. मात्र त्याला अपेक्षित गती नसल्याने दोन दिवसांपूर्वीच पदभार स्विकारणार्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अधिकार्यांसह रविवारी (ता.25) पठारभागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नांदूर खंदरमाळ येथील शेतकर्यांशी संवाद साधतांना थेट बांधावर जावून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदविताना सोमवारी (ता.26) दुपारपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश बजावले. परिसरातील अनेक शेतकर्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसह प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचार्यांअभावी बंद असल्याची व पावसामुळे पठारावरील सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आरोग्य उपकेंद्राबाबत मुख्यालयात जाताच जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या खराब आहे, मात्र शासनस्तरावर त्यासाठी प्रयत्न सुरु असून निधी उपलब्ध होताच त्याकडे लक्ष देवू. मी देखील शेतकर्याचा मुलगा आहे, त्यामुळे तुमच्या व्यथा मी समजू शकतो. जे जे चांगलं करता येईल ते ते करण्याचा आपला प्रयत्न राहील असे त्यांनी उपस्थित शेतकर्यांशी बोलतांना सांगितले.

नांदूरच्या सरपंच सुनंदा भागवत, उपसरपंच गणेश सुपेकर व शिवाजी भागवत यांनी पठारावरील जीवन, येथील अर्थकारण व नागरी समस्या याबाबतची माहिती देतानाच जिल्हाधिकार्यांनी थेट शेतकर्याच्या बांधावर येवून नुकसानीची पाहणी करण्याचा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवल्याचे सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कृषी मंडल अधिकारी पंढरीनाथ लेंडे, मंडलाधिकारी किसन लोहारे, कामगार तलाठी केशव शिरोळे, प्रदीप मंडलिक व ग्रामसेवक अजित घुले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांच्या भेटीदरम्यान उपसरपंच ज्ञानेश्वर सुपेकर यांच्यासह पोपट सुपेकर, काशिनाथ भागवत, संतोष टावरे, पंढरीनाथ भागवत, सखाहरी करंजेकर, सदाशिव काठे, शांताराम मोरे, मनाजी सुपेकर, शरद सुपेकर, दत्तापाटील सुपेकर, किसन सुपेकर, सुदाम भागवत, रमेश मोरे, अमर करंजेकर, रत्नाकर गाडेकर, नंदकुमार भागवत व बाळासाहेब भागवत आदिंसह नांदूर व परिसरातील बावपठार, मोरेवाडी, खैरदरा आदी भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पठार भागातील बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. शेंदरी (लाल) कांद्याचे आगार समजल्या जाणार्या पठारावरील या मुख्य पिकासह सोयाबीन, भुईमूग व बाजरीच्या जवळपास 675 शेतकर्यांच्या 550 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या शिवारातील पंचनाम्याचे कामकाज जवळपास पूर्ण केले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची माती झाल्याने दरवर्षी धुमधडाक्यात दिवाळी साजर्या करणार्या पठारावरील शेतकर्यांना आता दिवाळीसाठीही सरकारी मदतीची प्रतीक्षा आहे.

