वडाळा महादेव येथील पिंपळे वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ प्रतिकार करताना दोघे जखमी; श्वान पथकासही केले होते पाचारण


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रस्त्यावरील पिंपळे वस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठीस धरून मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना देवीदास पिंपळे यांच्यासह एक महिला जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पिंपळे वस्तीवर रविवारी (ता.19) पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. हा प्रकार लक्षात येताच देवीदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी पिंपळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील एक महिला मध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी पिंपळे यांच्या डोक्याला तसेच हातापायांना जबर मार लागला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तत्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी ऐवज चोरून नेला किंवा नाही हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

यावेळी नागरिकांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, घायवट, मुख्य हवालदार परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, दरेकर, गौतम लगड, हरीश पानसंबळ, पोलीस शिपाई सुनील दिघे, पंकज गोसावी, महेश पवार, तुषार गायकवाड यांच्या पथकाने तत्काळ पिंपळे वस्तीवर भेट दिली. त्यांनी जखमी देविदास पिंपळे व इतरांना औषधोपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता तेथे दरोडेखोरांची दुचाकी आढळून आली आहे. सकाळी घटनास्थळी अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, वडाळा महादेव येथील वस्तीवरून दुचाकी घेऊन हल्लेखोर पसार झाले. पिंपळे वस्तीवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून तर्कवितर्क काढले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Visits: 15 Today: 2 Total: 115160

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *