आर्थिक निर्णय घेताना वेळ घ्या, घाई करु नका ः डॉ. जोशी कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; आर्थिक साक्षरतेवर केले मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात बँका व इतर वित्तीय आस्थापनांमध्ये फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार (फॉरेन्सिक फ्रॉड) थांबवण्याचे काम फॉरेन्सिक अकौंटंट (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) करतात. तंत्रज्ञान व लेखापरीक्षणाचा आधार घेऊन अशाप्रकारच्या फसवणुकीचे प्रकार उघड करताना न्यायालयासमोर पुरावे सादर करण्याचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. अपूर्वा जोशी यांनी केले.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने कवी अनंत फंदी व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. मुलाखतवजा प्रश्नोत्तराच्या फॉर्ममध्ये व्याख्यानमालेच्या प्रकल्प संचालक स्मिता गुणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, प्रकल्प संचालक अॅड. ज्योती मालपाणी आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधाकर जोशी म्हणाले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आर्थिक समृध्दी नांदत असून विविध पतसंस्थांचे मोठे जाळे उभे राहिले आहे. चांगल्या कारभाराचा आदर्श असलेल्या सहकारी संस्थांमुळे बाजारपेठ समृध्द झाली आहे. तालुक्यातील नागरिक आर्थिक क्षेत्राकडे डोळसपणे बघत असला तरी, भविष्यात वाढणार्या सायबर क्राईमबाबत सजग असणे व आर्थिक साक्षरता महत्वाची आहे.

तरुण वयातच फॉरेन्सिक अकौंटन्सी या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करताना १५ वर्षांत या क्षेत्रातील दोन डॉक्टरेट मिळवलेल्या अपूर्वा जोशी यांनी सोप्या शब्दांत आर्थिक गुन्ह्यांमागील कारणे व कार्यपध्दती उलगडताना त्या शोधण्यासाठी कराव्या लागणार्या दिव्याची माहिती दिली. या ग्लोबल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ऑडिट व अकौंटन्सीचा पाया असावा लागतो. तसेच कायद्याची पदवी व गुन्हेगारीच्या मानसशास्त्राचा अभ्यास असल्यास मोठा फायदा होतो. यात तंत्रज्ञान हा महत्वाचा भाग समाविष्ट झाल्याने कॉम्प्युटर फॉरेन्सिक क्षेत्रातही करिअर होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले.

नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारख्या मोठ्या कर्जदारांच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती दिली. घोटाळे शोधण्याचे काम करताना, बदल करण्यासाठी संबंधित पार्टीने देऊ केलेल्या पैशाच्या मोहात न पडता तत्व जपणे महत्वाचे असते, तसेच अशावेळी आपल्या सहाव्या इंद्रियाने दिलेला संदेश मानणे गरजेचे असल्याचे शिकता आले. आपल्या बँक खात्याचा जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून गैरवापर होण्याची शक्यता असल्याने क्विक मनीच्या फंदात पडू नये. व्यवहार करताना डोळे उघडे ठेवावेत. कारण अनेक छोट्या गोष्टी नंतर मोठे रुप धारण करतात असा सल्लाही त्यांनी दिला.
