नगरपालिका निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढणार ः आ. डॉ. तांबे देवळाली प्रवरा येथे सभासद नोंदणी व काँग्रेस मेळावा उत्साहात

नायक वृत्तसेवा, राहुरी
ज्या-ज्यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता राहिली, त्या-त्यावेळेस शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सभासद नोंदणी व काँग्रेस मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते. यावेळी आमदार लहू कानडे, ज्ञानदेव वाफारे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवकचे महासचिव करण ससाणे, संजय पोटे, अंकुश कानडे, संभाजी कदम, उत्तम कडू, नानासाहेब कदम, वैभव गिरमे, अन्सार इनामदार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, भाजपने कर्जमाफी दिली. मात्र ती घेण्यासाठी शेतकर्यांना किती त्रास झाला? महाविकास आघाडीने 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली. एकाही शेतकर्याला कर्जमाफी घेताना त्रास झाला नाही. देवळाली प्रवरामध्ये 2001a मध्ये नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासगंगा उभी राहिली. सध्या देवळाली शहरात सध्या सत्ताधार्यांकडून असमाधानकारक काम सुरू आहे. मात्र, येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला संधी भेटून पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार लहू कानडे म्हणाले, प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा स्थापन केली आहे. भाजपची वृत्ती शेतकर्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारला शेतकर्यांच्या जमिनी कारखानदारांच्या घशात घालायच्या आहेत. त्यासाठी शेतकर्यांच्या विरोधात काळे कायदे करण्यात आले आहेत. यावेळी चांगदेव चव्हाण, कुमार भिंगारे, जयेश माळी, गंगाधर गायकवाड, गीताराम बर्डे, इंदुमती खांदे, रंजना चव्हाण, ज्योती गिरमे, सविता चव्हाण, भाग्यश्री कदम, शोभा कदम आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
