विश्रामगडावर मराठा आरक्षणावर बोलणे उचित नाही ः जरांगे शिवपदस्पर्श पावन दिनानिमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन

नायक वृत्तसेवा, अकोले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर मराठा आरक्षणावर बोलणे उचित ठरणार नाही आणि कोणी बोलूही नये. कारण ही पावन भूमी सगळ्या जाती-धर्माची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्रामगडाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे आवाहन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी केले.

अकोले तालुक्यातील विश्रामगड (पट्टाकिल्ला) येथे बुधवारी (ता.२२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ३४४ व्या शिवपदस्पर्श पावन दिनानिमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर अभिवादन सभेत ते बोलत होते. अकोले तालुकावासीय खूप नशीबवान आहेत. कारण महाराजांनी येथे विश्राम केला ती माती कपाळी लावण्याचे भाग्य तुम्हांला मिळाले. आपण छत्रपतींनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालले पाहिजे व सर्वधर्मसमभाव जपला पाहिजे हेच त्यांना अभिवादन ठरेल असे त्यांनी नमूद केले.

दरवर्षीप्रमाणे पट्टाकिल्ला येथे सकल मराठा समाज अकोले तालुका व विश्रामगड विकास महामंडळ यांच्यावतीने शिवपदस्पर्श पावन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी अकोले व सिन्नर तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या आनंदाने व उत्साहात हा सोहळा साजरा केला. जालना स्वारीच्या वेळी रायतेवाडी (ता. संगमनेर) येथील लढाई करुन छत्रपती शिवाजी महाराज २२ नोव्हेंबर १६७९ रोजी पट्टाकिल्ला (विश्रामगड, ता. अकोले) येथे विश्रांतीसाठी १५ ते १७ थांबले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा गड व परिसर पावन झालेला आहे. त्यानिमित्ताने आयोजित अभिवादन सभा यशस्वी करण्यासाठी दिलीप शेणकर, डॉ. संदीप कडलग, महेश नवले, सोमनाथ नवले, योगेश शिंदे, डॉ. मनोज मोरे, प्रदीप हासे, माधव तिटमे, अरुण शेळके, अॅड. वसंत मनकर, विनय सावंत, गणेश आवारी, सुरेश नवले, वैभव वाकचौरे, अण्णासाहेब थोरात, अक्षय अभाळे, कैलास जाधव, राहुल शेटे, संदीप शेणकर, देवराम लोहटे, शांताराम वाकचौरे, राहुल वाकचौरे, राजेंद्र देशमुख, विनोद हांडे, बाळासाहेब भांगरे, संदीप डोंगरे, रोहिदास सोनवणे, शुभम फापाळे, बबन तिकांडे आदिंनी परिश्रम घेतले.
