शिर्डीत मुस्लीम बांधव रामजन्मोत्सवात तर हिंदू संदल उरुसात दंग! हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक ठरलेल्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीत साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे हे 112 वे वर्ष असून येथील रामनवमी उत्सवाचे एक विशेष वेगळेपण आहे. अनेक दशकांपासून हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. यानिमित्ताने देश-विदेशातील भाविक साईनगरीत येत आहे. शिर्डीत रामनवमी उत्सव कसा आणि कधी सुरू झाला? त्यामागची काय कहाणी आहे? हिंदू-मुस्लीम ऐक्य कसं साधलं जातं? याविषयी साईमंदिराचे निवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी आणि अब्दुल बाबांचे वंशज गनीभाई यांनी माहिती दिली आहे.

साईबाबा मंदिराचे माजी मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी म्हणाले, ‘साईबाबांनी स्वतः श्री रामनवमी उत्सव सुरू केला. गोपाळराव गुंड नावाच्या व्यक्तीने साईबाबांना आपण एक उरूस भरावावा अशी संकल्पना मांडली. दोन वर्ष झाल्यानंतर लेखक भीष्म यांच्या असं लक्षात आलं की हा उरूस नेमका श्रीराम जन्मदिनी भरला जातो. त्याला आपण रामजन्मोत्सव का करू नये. त्यामुळे काका महाजनांना त्यांनी सांगितले की आपण बाबांची आज्ञा घेऊया. त्यानंतर ते बाबांकडे गेले आणि त्यांनी आज्ञा देताच बाबांच्या समोर पाळणा बांधून पहिला रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. राम जन्म उत्सवाचं पहिलं कीर्तन श्री कृष्ण भीष्म यांनी स्वतः केलं. त्यांना हार्मोनियमची साथ स्वतः काका महाजनांनी दिली. बाबांच्या आज्ञेने हा रामनवमी उत्सव सुरू झाला.’

‘रामजन्मोत्सवाच्या दिवशीच संध्याकाळी उरूस भरलेला असतो म्हणून मुस्लीम बांधवही बाबांकडे गेले आणि आपल्याला संदल मिरवणूक करायची आहे, असं सांगितलं. संदल मिरवणुकीसाठीही बाबांनी आज्ञा दिली. तेव्हापासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक ठरलेला रामनवमी उत्सव उदयास आला. आजही प्रतीकात्मक स्वरूपात श्रीरामनवमी उत्सवात रथयात्रा, किंवा रामजन्मोत्सवात मुस्लीम बांधव हिरीरीने सहभाग घेतात आणि उत्साहाने कार्यक्रम पार पडतो. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या संदल मिरवणुकीच्या कार्यक्रमात हिंदू बांधव उपस्थित राहतात. असे एकत्रितरीत्या बाबांच्या समाधीवर चंदनाचे ठसे उमटवली जातात आणि द्वारकामाई मशिदीत संदल मिरवणूक होते,’ अशी माहिती बाळकृष्ण जोशी यांनी दिली. दरम्यान, रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी असल्याने राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. पुढील दोन दिवस हा उत्सव सुरू राहणार असून पहाटे काकड आरतीपासूनच भाविकांनी साई दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यातच रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलेला असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
