… तर कोल्हार-घोटी मार्गाचे काम पुढे होऊ देणार नाही ः वाकचौरे निकृष्ट कामाच्या विरोधात सुगाव बुद्रुक फाट्यावर रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील डांबरीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोल्हार-घोटी मार्गाचे काम पुढे होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांनी दिला आहे.
कोल्हार-घोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या विरोधात सुगाव बु. फाट्यावर कोल्हार-घोटी मार्गावर सुगाव, मनोहरपूर, कळस ग्रामस्थांच्यावतीने नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या मध्ये येणार्या ओढ्या-नाल्यांवर सिडीवर्क तयार करावेत, बत्तीस गाव पाणी पुरवठा योजनेचे पाईप रस्त्यात गाडले त्याची दुरुस्ती करावी, शेतकरी पुत्रांच्या समस्यांसंबंधित अधिकारी-ठेकेदार समजावून न घेता आडमुठी भूमिका घेतात त्या समजावून घ्याव्यात आणि जोपर्यंत अकोले-संगमनेर रस्त्याचे कळसपर्यंतचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढील काम होऊ देणार नसल्याचा इशारा राज्य सचिव विजय वाकचौरे, संजय वाकचौरे यांनी दिला आहे.
सुगाव येथील गाजराचा वहाळ पुलाची उंची वाढवून भरावा करावा, तर कळस बु.येथे पेट्रोल पंपानजीक असलेल्या पुलाची उंची वाढवून वळण सरळ करावे. जेणेकरून अपघात कमी होण्यास मदत होईल या साध्या मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले असल्याचेही त्यांनी नमूद केले. सदर मागणीचे निवेदन स्वीकारण्यास तहसीलदार हजर न राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांवर देखील रोष व्यक्त केला.
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याच्या कामाला मंजुरी देताना सर्व प्रकारच्या तरतुदी केल्या आहे. चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नसल्याचे भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले. तर अकोले तालुक्यातील खडी, मुरुम मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. तर तालुक्यातील काम पूर्ण झाल्याशिवाय खडी, मुरूम, वाळू, रेती कळसच्या पुढे जाऊ देणार नसल्याचेही रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवांदे म्हणाले.
या रास्ता रोकोमध्ये विकास वाकचौरे, सुगावचे माजी सरपंच रवींद्र जगदाळे, सुरेश शिंदे, महेश देशमुख, मनोहरपूरचे माजी सरपंच बबन भांगरे, शेतकरी नेते सुरेश नवले, मधुकर देशमुख, शिवाजी देशमुख, बाळू उगले, बी.डी.देशमुख, तान्हाजी देशमुख, बाळासाहेब शिंदे, वसंत भांगरे, अनिल देशमुख, विनेश देशमुख, सुभाष देशमुख आदी सहभागी होते. दरम्यान, रास्तो रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवटी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री.कडाळे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिले. पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.