‘एलसीबी’ने सोडले अन् संगमनेर शहर पोलिसांनी पकडले! आरोपी पलायन प्रकरण; थेट मालेगावातून मोठ्या ‘आसामी’ला झाली अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातून चार आरोपींनी पलायन केले होते. शहर पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणार्या या प्रकरणातील पसार आरोपींनी कारागृहात मोबाईल, गावठी कट्टा आणि गज कापण्यासाठीचा हेक्सा ब्लेड खूप आधीच मिळवले होते. त्याशिवाय पळून जाण्याची वेळही निश्चित करुन नेमक्या त्याचवेळी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चारचाकी वाहनही सज्ज ठेवले गेले होते. इतक्या पद्धतशीरपणे घडलेल्या या प्रकरणाची साधी कल्पनाही पोलिसांना आली नाही आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शहर पोलिसांची राज्यभर नाचक्की झाली. स्थानिक गुन्हे शाखेने सगळं ‘बळ’ वापरुन अवघ्या ३० तासांतच आरोपींचा मागही काढला आणि त्यांच्या मुसक्याही आवळल्या. मात्र इतक्या धावपळीतही त्यांनी मालेगावात ‘हात’ मारलाच आणि त्याला सोडून चार आरोपींसह त्यांना मदत करणार्या दोघांना ताब्यात घेतले. अर्थात ज्याला ‘एलसीबी’ने सोडून दिले, त्यालाच आता शहर पोलिसांनी मालेगावातून उचलून आणले असून न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.२०) त्याला पोलीस कोठडीत पाठवले आहे. जलद तपासाच्या कारणाने अभिनंदनास पात्र ठरलेल्या ‘एलसीबी’ने या प्रकरणातही साधलेला ‘डाव’ मात्र त्यांचे कर्तृत्व काळवंडवून गेला आहे.

दिवाळीच्या तोंडावर ८ नोव्हेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या भिंतीलगतच असलेल्या उपकारागृहाचे तीन गज कापून राहुल देवीदास काळे (वय ३१, रा. वडगाव पान), रोशन रमेश दधेल उर्फ थापा (वय २५, रा. इंदिरानगर, मूळ रा. नेपाळ), मच्छिंद्र मनाजी जाधव (वय ३३, रा. घारगाव) व अनिल छबु ढोले (वय ४०, रा. ढोलेवाडी) हे खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार व पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपी पळून गेले होते. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली असताना पळून गेलेल्या आरोपींनी त्यासाठी केलेले नियोजनही समोर आले. त्यातून शहर पोलिसांचे अक्षरशः धिंदवडे उडवले गेले. जवळपास महिनाभर गज कापण्याचा प्रकार, कारागृहात मोबाईलचा सर्रास वापर, पळून जाण्याच्या कितीतरी दिवस आधीच विनासायास आत पोहोचलेला गावठी कट्टा, पळून जाण्याच्या नेमक्या वेळची स्थिती आणि वाहनासह आरोपींनी केलेले काटेकोर नियोजन यांचा विचार करता शहर पोलिसांची लक्तरेच वेशीला टांगली गेली.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सदरचा प्रकार गांभीर्याने घेताना तिघा पोलीस कर्मचार्यांना निलंबित करीत या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. भाऊंच्या टोळीने या संधीचेही सोने करीत अवघ्या २४ तासांतच आरोपींचा माग काढला. अर्थात यातही मोठी गोम आहे, आरोपींचे वाहन नादुरुस्त झाल्याचे व नंतर ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले होते त्याची माहितीही संगमनेर पोलिसांना मिळाली होती. मात्र त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या भागातच असल्याने आरोपींना पळून जाण्यास वाव मिळू नये यासाठी ती माहिती त्यांना देण्यात आली. दुर्दैवाने एलसीबीचा छापा पडण्यापूर्वीच आरोपी तेथून सटकले, मात्र त्यांची दिशा आणि अन्य तांत्रिक माहिती उपलब्ध झाल्याने भाऊंच्या टिमने शेतालगत कालव्यात आंघोळ करणार्या आरोपींना शिताफीने पकडले. त्या चौघांसोबत संगमनेरातून त्यांची साथ देणार्या अल्ताफ आसिफ शेख (रा. भोसरी, जि. पुणे, मूळ रा. कुरण) व पुण्याहून चारचाकी वाहन घेवून संगमनेरात आलेला चालक मोहनलाल नेताजी भाटी (वय ४७, रा. वडगाव शेरी) या दोघांनाही ताब्यात घेतले.

एकंदरीत त्यांना ताब्यात घेईस्तोवर तिथपर्यंत पोहोचण्यास कोणी मदत केली याचाही शोध क्रमप्राप्तच आहे. त्यानुसार एलसीबीच्या टिमने मालगाव येथील एका नामचीन व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कारागृहातून पळून गेल्यानंतर वरील सहाजण जवळपास दोन तास या माणसाकडून पाहुणचार झोडीत होते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद असताना आरोपी राहुल काळे याचा त्याच्याशी दोस्ताना झाला होता. कायद्यानुसार कारागृहातून पळालेले आरोपी आपल्याकडे येवून गेल्याची माहिती त्याने पोलिसांना देणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच घडले नव्हते, त्यामुळे एलसीबीने त्याला ताब्यात घेणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात त्याला सोडून देण्यात आले. आता असे का घडले असा प्रश्न वाचकांच्या मनात नक्कीच आला असेल?. तर त्याचे उत्तर आरोपींप्रमाणेच पथकाचीही त्याने उत्तम बडदास्त ठेवली होती, त्याची परतफेड त्याला सोडून करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

मात्र, कायद्याने त्याने आरोपींना पळून जाण्यास मदतच केलेली असल्याने संगमनेर पोलिसांनी आपल्या तपासाची व्याप्ती वाढवताना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील दोन हजार खोली भागात राहणार्या मोहंमद रिजवान मोहंमद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला (वय ५०) याला गुरुवारी (ता.१६) रात्री अटक केली. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी सोमवारपर्यंत (ता.२०) त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत आरोपींना पळून जाण्यास मदत करणार्या सातजणांची नावे समोर आली असून प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २४, रा. घुलेवाडी), कलिम अकबर पठाण (वय २०, रा. कोल्हेवाडी रोड) व हलिम अकबर पठाण (वय २२, रा. जमजम कॉलनी) या तिघांना शनिवारी (ता.११) मध्यरात्री अटक करण्यात आली. तर सलीम अकबर पठाण (रा .संगमनेर) हा अद्याप पसार आहे.

संगमनेर पोलीस ठाण्याच्या भिंतीलगत असतानाही चार आरोपी कारागृहाचे गज कापून पसार झाल्याने संगमनेर पोलिसांची लक्तरे राज्यभर उधडली गेली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात जलद हालचाली करीत स्थानिक गुन्हे शाखेकरवी अवघ्या तीस तासांच्या आतच पळून गेलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाने जिल्हा पोलिसांची राज्यभर नाचक्कीही झाली, त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने सदरचे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र ज्याने तब्बल दोन तास आरोपींची खानपानासह उत्तम बडदास्त ठेवली त्याला पकडून ‘नंतर’ सहीसलामत सोडून देण्याचा प्रकार एलसीबीच्या कर्तृत्वावरच शंका निर्माण करणारा ठरला.

