संगमनेर पोलिसांनी पाठलाग करीत पकडली बिहारी टोळी! आंतरराज्य टोळी उघड होण्याची शक्यता; सात लाखांतील 90 टक्के रक्कमही केली हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय गजबजलेल्या बाजार समितीच्या आवारातून कांदा व्यापार्याची सात लाखांची रोकड लांबविण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी समोर आला. या प्रकरणात पैशांची बॅग घेवून पळून जाणार्या चोरट्यांचा सुरुवातीला काही नागरिकांनी तर काही क्षणात शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आणि तिघातील दोघांच्या मुसक्या आवळीत चोरलेल्या रकमेतील तब्बल 90 टक्के रक्कम हस्तगत केली. या गदारोळात तिसरा आरोपी मात्र गर्दीचा फायदा घेत गायब झाला. या प्रकरणी तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांच्या विशेष पथकासह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासातून रोकड लांबविणारी आंतरराज्य टोळी उघड होण्याची दाट शक्यता असून पोलीस पळून गेलेल्या आरोपीच्या मागावर आहेत. या घटनेनंतर पैसे घेवून पळणार्या चोरट्यांकडून रस्त्यात पैशांचे बंडलही पडले, मात्र दोघा प्रामाणिक तरुणांनी ते पोलिसांना परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी (ता.7) संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडला. दर बुधवारी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होत असल्याने शेतकरी आणि व्यापार्यांची मोठी वर्दळ असते, त्याप्रमाणे कालही हा संपूर्ण परिसर गजबजलेला होता. येथील कांदा व्यापारी अण्णासाहेब उगले यांनी सकाळच्या सत्रात विविध ठिकाणच्या शेतकर्यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्यांचे पैसे देण्यासाठी त्यांनी आपले कर्मचारी पांडूरंग यशवंत शेटे (वय 55) यांच्यासह अन्य एका कर्मचार्याला नवीन नगर रस्त्यावरील एचडीएफसी बँकेत पाठवले. त्यानुसार ते दोघेही दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरुन बँकेत पोहोचले.

या प्रकरणाची आधीच माहिती असावी या प्रमाणे पांडूरंग शेटे बँकेतून पैसे काढण्यासाठी बाजार समितीच्या आवारातून निघाले तेव्हाच तेथून दोन होंडा युनिकॉर्न मोटार सायकलवर असलेल्या तिघा चेारट्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. ते दोघेही बँकेतून पैसे घेवून दुपारी दीडच्या सुमारास बाहेर पडताच त्या तिघांही चोरट्यांनी पुन्हा त्यांचा पाठलाग सुरु केला. ते दोघेही बाजार समितीमधील आपल्या परमेश्वर ट्रेडींग कंपनीजवळ पोहोचल्यावर पाठीमागे बसलेला कर्मचारी दुचाकीवरुन खाली उतरताच एका दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी त्यांना धक्का देत त्यांच्या दुचाकीच्या सिटवर ठेवलेली पैशांची बँग घेवून तेथून सुसाट वेगाने पळ काढला. त्यामुळे ‘ते’ दोघेही चोरऽ.. चोरऽ.. म्हणून ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने आवारातील सर्वांचेच लक्ष्य चोरट्यांवर खिळल्याने त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग वाढवला.

यावेळी बाजार समितीतून बाहेर पडणार्या शेतकर्यांच्या वाहनांची संख्याही अधिक असल्याने पळून जाणार्या चोरट्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीचा धक्का लागल्याने ते दोघेही खाली पडले. त्या गडबडीतही त्यांनी आपली दुचाकी उचलून तेथून पळ काढला, मात्र यावेळी त्यांनी लांबविलेल्या पैशांच्या बँगमधील काही नोटांचे बंडल रस्त्यावरही पडले. मात्र तशाही अवस्थेत ते तेथून सुसाट निसटले. त्याचवेळी शहर पोलीस ठाण्याची तीन वाहने एकाचवेळी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी लागलीच सिनेस्टाईल पाठलाग करीत अवघ्या काही अंतरावरच पळून जाणार्या एका दुचाकीवरील दोघा चोरट्यांना दिवटे किराणा दुकानाजवळच पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरलेल्या सात लाखांच्या रकमेतील 6 लाख 57 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

हा सगळा प्रकार ऐन गर्दीच्यावेळी सतत गजबजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्याच्या परिसरात घडल्याने बघ्याची प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यातून अफवांचे पेव फुटून शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करुन जमाव पांगवावा लागला. पकडलेल्या दोघाही चोरट्यांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पळून गेलेल्या तिसर्या आरोपीचे नाव समोर आले. या प्रकरणी अण्णासाहेब उगले या कांदा व्यापार्याकडे कार्यरत असलेल्या पांडूरंग शेटे यांनी रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी अन्नुकुमार अबदेश यादव व अमनकुमार जगमोहन यादव (दोघेही रा.नयाटोला, जि.कटीहार, बिहार) यांच्यासह पळून गेलेल्या तिसर्या आरोपीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकाराची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने नोंद घेतली असून त्याचा तपास शहर पोलिसांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यातून पोलिसांनी तिसर्या चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली असून तो शिर्डीत दडून बसल्याचीही माहिती मिळाली आहे. या टोळीच्या चौकशीतून बँकेतून पैसे काढणार्यांच्या बँगा लांबविणारी आंतरराज्य टोळी उघड होण्याची दाट शक्यता असून पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखालील शहर पोलीस ठाण्याचे पथक त्या दृष्टीने कसून तपास करीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवल्याने पळून जाणारे चोर आणि त्यांनी लांबविलेल्या रकमेतील 90 टक्के रक्कम हस्तगत झाल्याने शहरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

असाही प्रामाणिकपणा!
पळून जाणार्या चोरट्यांच्या हातातील बॅगमधून रस्त्यावर पैशांची काही बंडले पडली होती. त्यातील 11 हजारांची रक्कम स्वदेश उद्योग समूहात वाहनचालक म्हणून काम करणार्या सौरभ दुबे या तरुणाला तर प्रत्येकी एक हजारचे दोन बंडल अन्य एकाला सापडले. त्या दोघांनीही प्रामाणिकपणे ती रक्कम अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कारही केला. चोरलेल्या रकमेतून अद्यापही 30 हजारांची रक्कम गहाळ असून ती रस्त्यात पडून कोणी नेली की पळून गेलेल्या चोरट्याने लांबविली याचा शोध सुरु आहे.

या प्रकरणातील पळून गेलेला तिसरा चोरटा शिर्डीत दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून स्थानिक आणि एलसीबीचे पथक त्याच्या मागावर आहेत. बुधवारी पकडण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्यांच्या चौकशीतून रोकड लांबविणारी आंतरराज्य टोळी उघड होण्याची दाट शक्यता आहे. पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.

