आयशर टेम्पोची टँकरला धडक; पुणे-नाशिक महामार्गावर तेलाचा सडा

आयशर टेम्पोची टँकरला धडक; पुणे-नाशिक महामार्गावर तेलाचा सडा
हजारो लिटर तेल गेले वाया, क्लिनर गंभीर जखमी तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नवीन माहुली एकल घाटात सोयाबीनचे कच्चे तेल घेवून जाणार्‍या टँकरला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे महामार्गावर अंदाजे दहा हजार लिटर तेलाचा सडा पडल्याचे दिसले. तर या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघात शुक्रवारी (ता.16) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला आहे.


याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मालवाहू टँकरवरील (क्र. एमएच.46, एफ.4423) चालक हा धुळेहून सोयाबीनचे वीस टन कच्चे तेल घेवून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा टँकर नवीन माहुली एकल घाटात आला असता त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पोने (क्र.एमएच.42, टी.2179) टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी टँकरला दोन ठिकाणी मोठ्या चिरा पडून तेल महामार्गावर वाहू लागले. तर आयशर टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे दबल्याने क्लिनर दबला जाऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत होता.


दरम्यान, महामार्गावरुन येणार्‍या-जाणार्‍या वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून आयशर टेम्पोमध्ये दबलेल्या क्लिनरला सुखरूपपणे बाहेर काढले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र टँकरमधील तेल गळती थांबलेली नव्हती. मोठ्या प्रमाणात तेल गळती सुरू राहिल्याने महामार्गावर तेलाचा सडाच पडला होता. तर महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गटारांमध्ये तेल साचले होते. सकाळी टोलनाक्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तेल सांडलेल्या ठिकठिकाणी वाहने सरकू नये म्हणून माती टाकली होती. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनांना महामार्गावरुन हटविण्यात आले होते. मात्र, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116532

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *