पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडले चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद; शिर्डी पोलीस करताहेत तपास


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगाव येथे शनिवारी (ता.27) पहाटे चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून मशीनमधील सर्व रक्कम चोरून नेली. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एटीएम मशीन देखील आपल्याबरोबर नेले आहे. यामुळे पोहेगाव परिसरात घबराट निर्माण झाली असून व्यापारी संकुलात आघाडीवर असलेल्या गावचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे 3 वाजता अज्ञात चोरट्यांनी परिसरातील वातावरणाचा आढावा घेत इंडियन ओव्हरसीजच्या एटीएम मशीन रूममध्ये प्रवेश केला. लोखंडी टॉमी व इतर इलेक्ट्रिक साहित्याच्या आधारे त्यांनी आजूबाजूचे सर्व अँगल व मशिनची तोडफोड केली. साधारण चार ते पाच हे चोरटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर घटना बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरटे कशा पद्धतीने चोरी करत आहे याचे सर्व चित्रीकरण झाले आहे.

एटीएम फुटल्याची माहिती पोलीस पाटील जयंत रोहमारे यांनी शिर्डी पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस नाईक अविनाश मकासरे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल बाबा आहेर, वर्पे घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे व्यवस्थापक बी. डी. कोरडे, राम गौर यांना याबाबत त्यांनी माहिती विचारली असता शुक्रवारी संध्याकाळी बँकेची सुट्टी झाल्यावर बँकेत 1 लाख 32 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज शेजारील गौतम सहकारी बँकेचेही सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरट्यांनी सदर एटीएम मशीन खोलून नेण्यासाठी पिकअप गाडीचा वापर केला होता. मशीन खोलल्यानंतर अतिशय वजनदार असल्याने गाडीत टाकता न आल्याने त्यांनी वायर रोप लावत गाडीच्या मागच्या बाजूला ते बांधून पोहेगाव पाथरे रस्त्याने शिंदे वस्तीलगत निर्जन ठिकाणी नेले असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते कैलास औताडे यांना आला. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक दुधाळ यांना दिली असता सर्वांना बरोबर घेत ते ठिकाण गाठले. मशीन अवजड असल्याने चोरट्यांना ते फोडता आले नाही. सदर मशीन त्यांनी कालव्याच्या कडेला काट्या टाकून लपून ठेवले. लपलेले मशीन पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने हे मशीन शिर्डी पोलीस ठाण्यात पाठवले आहे. दोन तास चोरीचे प्रयत्न करून चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याची चर्चा दिवसभर गावात पसरली. पोहेगाव एटीएम चोरीची ही तिसरी घटना असून परिसरात व्यापारी वर्गाचे मोठे जाळे झाले आहे. अशा घटना घडल्याने व्यापार्‍यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visits: 93 Today: 1 Total: 1115269

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *