अकोल्यात संगमनेरला जाणारा तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला

अकोल्यात संगमनेरला जाणारा तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला
अद्यापही गुन्हा दाखल नसल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण
नायक वृत्तसेवा, अकोले
पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तालुक्यातून संगमनेरला जाणारा तांदूळ भरलेला ट्रक पकडला. रविवारी (ता.13) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मात्री सोमवारी (ता.14) सकाळपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदरचा तांदूळ हा रेशनचा असल्याच्या संशयाने हा तांदूळ पकडला. मात्र हा तांदूळ रेशनचा आहे की आणखी कशाचा? याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकारी राकेश रावते यांनी दिली.


दरम्यान, पकडलेल्या ट्रकमध्ये साडे बारा टन तांदूळ गोण्यात भरलेला होता. काळ्या बाजारातील रेशनचा हा तांदूळ घेऊन ट्रक जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच पथक पाठवून कारवाई केली. राजूर येथून संगमनेरला जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक (एमएच.17, एजी.2483) मनोहरपूर फाटा येथे पकडून अकोले पोलीस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी चालक शहेबाज मणियार (रा.संगमनेर) याने सदर तांदूळ हा राजूर येथून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले.


सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी अकोले पोलीस ठाण्याला भेट देवून चौकशी केली. तसेच गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मात्र सोमवारी (ता.14) सकाळपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1107589

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *